नक्षली हल्ल्यात तीन जवान शहीद
By admin | Published: August 27, 2015 04:31 AM2015-08-27T04:31:52+5:302015-08-27T04:31:52+5:30
ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी बुधवारी पाळत ठेवून निमलष्करी दलाच्या गस्ती पथकावर हल्ला केला. यात सीमा सुरक्षा दलाचे
मलकानगिरी : ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी बुधवारी पाळत ठेवून निमलष्करी दलाच्या गस्ती पथकावर हल्ला केला. यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तीन जवान शहीद झाले, तसेच एक नागरिकही ठार झाला असून अन्य सहाजण जखमी झाले आहेत.
बीएसएफच्या १०४ तुकडीतील गस्तीपथक सकाळी ७.३० वाजता जनबाई छावणीजवळ असताना नक्षलवाद्यांनी प्रथम भूसुरुंग स्फोट घडविला आणि नंतर पथकावर तुफान गोळीबारही केला. या हल्ल्यात एक सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल शहीद झाले, तर कंपनीचे कमांडर सहायक कमांडंट अशोककुमार यांच्यासह सहाजण जखमी झाले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बीएसएफला नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत या भागात तैनात करण्यात आले असून मंगळवारी रात्री गस्तीवर निघालेले हे पथक मोहिमेवर असतानाच हा हल्ला झाला.
चित्रकोंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पिताबस धरुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांचे पथक नावेतून चित्रकोंडा तलाव पार करून चिंतमदोली घाटावर पोहोचल्यानंतर हल्ला झाला. जवानांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली. दरम्यान, जखमींपैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मलकानगिरी नक्षल हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. (वृत्तसंस्था)