बिहारमध्ये बोट बुडून तिघांचा मृत्यू; २० बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:38 AM2019-10-05T04:38:20+5:302019-10-05T04:40:42+5:30
बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत.
कटिहार : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत. या बोटीमध्ये ८० प्रवासी होते. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. जलसमाधी मिळालेल्या प्रवाशांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
मृतांमध्ये एक पुरुष, महिला व बालकाचा समावेश आहे. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहत किनारा गाठला, तर काही जणांना आजूबाजूच्या लोकांनी वाचविले. वीसपेक्षा बेपत्ता प्रवाशांचा पाणबुड्यांकरवी शोध घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
बिहार व पश्चिम बंगालच्या सीमेवरील जगन्नाथपूर घाट येथे गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजता ही दुर्घटना घडली.
रामपूर बाजारातून विविध वस्तूंची खरेदी करून वाजीदपूरचे रहिवासी आपल्या गावी परत येत असताना त्यांची बोट बुडाली.
पोलिसांनी सांगितले की, ४० प्रवासी क्षमतेच्या बोटीमध्ये जास्त प्रवासी भरल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.