तीन मजुरांची उत्तर प्रदेशात गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:41 AM2020-06-20T04:41:18+5:302020-06-20T04:41:27+5:30
राज्यातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन मजुरांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
फतेहपूर-बांदा (उत्तरप्रदेश) : राज्यातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन मजुरांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. फतेहपूर जिल्ह्यातील खागा भागात एका स्थलांतरित मजुराने फाशी घेतली. एक महिन्यापूर्वी तो दिल्लीहून परतला होता. राणा प्रताप (वय ३३) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्याच्या घराजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी व दोन वर्षांची मुलगी मागील काही काळापासून माहेरी राहण्यास गेलेली आहे. गुरुवारी रात्री तिचा फोन आल्यानंतर दोहोंमध्ये पुन्हा वादावादी झाली. त्यानंतर घरातील सर्व सदस्य झोपल्यावर त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली.
बांदामधील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मजुरांनी फाशी घेऊन जीवन संपवले. मिस्त्रीचे काम करणाऱ्या बृजराघव यादव (३६) याने घराच्या कौलारूला आधार देणाºया लाकडाला गळफास घेतला. दोन महिन्यांपासून कोणतेही काम न मिळाल्यामुळे तो त्रासला होता. घरखर्चावरून त्याचे पत्नीसमवेत सतत भांडण होत होते. त्यावरून त्याने आत्महत्या केल्याचे घरच्या लोकांचे म्हणणे आहे.
तेंदुरा भागात महेश्वरी रैदास यांचा मुलगा रज्जू (२१) याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. २५ दिवसांपूर्वी तो गुजरातच्या वापी शहरातून गावी परतला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.