ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पावणेतीन लाख प्रतिज्ञापत्रे सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:48 AM2022-11-18T06:48:35+5:302022-11-18T06:49:03+5:30
Shiv Sena: शिवसेना पक्षावरील हक्क कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने आज पावणेतीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली.
नवी दिल्ली : शिवसेना पक्षावरील हक्क कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने आज पावणेतीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली.
गेल्या १५ नोव्हेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने ‘खरी शिवसेना कुणाची’ यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने अतिरिक्त कागदपत्रे २३ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश ठाकरे व शिंदे गटाला दिले आहेत.
यानुसार आज ठाकरे गटाने शिवसेनेच्या राज्यभरातील व तसेच विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे सादर केली. या प्रतिज्ञापत्रांची संख्या २ लाख ८० हजार एवढी आहे. शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहरप्रमुख, तालुका प्रमुखांसह विविध राज्यांच्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्याही प्रतिज्ञापत्रांचा यात समावेश आहे.
ट्रक भरून प्रतिज्ञापत्रे
या प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे भरून एक ट्रक निवडणूक आयोगात गेला. या गठ्ठ्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची छायाचित्रेसुद्धा लावण्यात आलेली होती.