तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:42 AM2018-10-20T06:42:10+5:302018-10-20T06:42:24+5:30
श्रीनगर : सुरक्षा दलाच्या जवानांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न जोरात ...
श्रीनगर : सुरक्षा दलाच्या जवानांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न जोरात सुरू असतानाच या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.
सध्या सुमारे ३०० अतिरेकी पाकिस्तानातून घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी सुमारे २५० दहशतवादी नियंत्रणरेषेच्या जवळ आले असल्याने सुरक्षा दलाचे जवान डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. हे तिन्ही दहशतवादी गुरुवारी मध्यरात्रीनंतर बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागातील नियंत्रणरेषेजवळील गावातून कारने जात असताना संशय आल्याने त्यांना वाहन थांबविण्यास सांगण्यात आले. त्याबरोबर वाहनात बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.
त्याला त्याच पद्धतीने जवानांनी उत्तर दिले. मात्र शुक्रवारी पहाटेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या चकमकीत तिन्ही दहशतवादी मारले गेले. त्यांच्या कारमधून चार एके-रायफली आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्या. हे तिघेही पाकिस्तानातून घुसूनच आले होते, असे नंतर स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे अतिरेकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या चकमकीनंतर काश्मीरमधील सर्व सीमारेषा आणि नियंत्रणरेषेजवळ अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)