पुलवाम्यातील चकमकीत तीन दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:52 AM2020-06-27T03:52:53+5:302020-06-27T03:53:00+5:30
अनंतनाग जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर एक लहान मुलगा मरण पावला.
श्रीनगर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफली व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अन्य घटनेत अनंतनाग जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर एक लहान मुलगा मरण पावला.
पुलवामाच्या त्राल येथे चेवा उलार भागात दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोहीम हाती घेतली होती. तिथे दहशतवादी दडून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे वेढा घातला, त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चेवा उलार परिसराची सुरक्षा दलाच्या जवानांनी नाकाबंदी केली आहे.
या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा सुरक्षा दलाच्या जवानांनी कसून शोध घेतला. काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रे व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
>अब्दुल्लांकडून निषेध
अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद व आठ वर्षे वयाचा एक मुलगा ठार झाला आहे.
बिजबेहरा येथील पादशाही बाग ब्रिजजवळ सीआरपीएफ ९० बटालियनच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव शामलकुमार असून, ठार झालेल्या मुलाचे नाव निहान यावर असे आहे. निहान हा कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा भागातील रहिवासी होता.
हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा जवानांनी बिजबेहरा परिसराची नाकाबंदी केली आहे. अल्पवयीन मुलाची हत्या करणाºया दहशतवाद्यांचा नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र निषेध केला आहे.