हव्या ३० लाख बसगाड्या; उपलब्ध अवघ्या ३ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:16 AM2018-09-09T04:16:29+5:302018-09-09T04:16:30+5:30
भारतात सार्वजनिक बसगाड्यांची उपलब्धता एक दशांशपेक्षाही कमी आहे.
नवी दिल्ली : भारतात सार्वजनिक बसगाड्यांची उपलब्धता एक दशांशपेक्षाही कमी आहे. देशात ३० लाख बसगाड्यांची गरज असताना उपलब्ध बसगाड्यांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, सरकारी आकडेवारीनुसार देशात १९ लाख बसगाड्या आहेत. तथापि, त्यातील फक्त २.८ लाख बसगाड्या राज्य परिवहन महामंडळांमार्फत अथवा राज्य वाहन परवान्यांतर्गत चालविल्या जातात.
केंद्रीय परिवहन सचिव वाय. एस. मलिक यांनी सांगितले की, सामान्य प्रवाशांची गरज पूर्ण करण्यासाठी आम्हाला ३० लाख बसगाड्यांची गरज आहे. ज्या बस सरकारी संस्थांमार्फत चालविल्या जातात, त्याही पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत, असे दिसून आले आहे. त्यामुळे गरज आणि उपलब्धता यात मोठी तफावत आहे.
वाहतूक जाणकारांनी सांगितले की, सार्वजनिक बससेवेची घसरती गुणवत्ता आणि बसगाड्यांची अपुरी संख्या यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना आपली स्वत:ची वाहने खरेदी करणे भाग पडत आहे.
गडकरी यावेळी म्हणाले की, ‘ट्रान्स्पोर्ट फॉर लंडन’ (टीएफएल) यासारख्या मॉडेलसाठी खासगी व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. बसगाड्यांची निर्मिती करताना बससेवा देणारी कंपनीही तुम्ही सुरू करा, असे आवाहन मी बस उत्पादकांना केले आहे. टाटा आणि अशोक लेलँडसारखे उत्पादक यात गुंतवणूक करू शकतात.
>९० % लोकांकडे वाहन नाही
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, चीनमध्ये दर १ हजार लोकसंख्येमागे ६ बस रस्त्यावर धावत असतात. भारतात मात्र दर १० हजार लोकांमागे अवघ्या ४ बस आहेत. ९० टक्के भारतीयांकडे स्वत:चे वाहन नाहीत. हे लोक उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक सेवेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे.