अपहरणप्रकरणी आणखी तिघांना हैदराबादेत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 02:38 AM2021-01-12T02:38:29+5:302021-01-12T02:38:59+5:30

प्रवीणच्या घराची झडती घेण्याच्या बनावट वॉरंटसह १५ लोक प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करून ५ जानेवारीच्या रात्री प्रवीणच्या बोवेपल्ली येथील घरात घुसले होते.

Three more arrested in Hyderabad in kidnapping case | अपहरणप्रकरणी आणखी तिघांना हैदराबादेत अटक

अपहरणप्रकरणी आणखी तिघांना हैदराबादेत अटक

Next
ठळक मुद्देआंध्र प्रदेशच्या माजी मंत्र्यांचे कारस्थान

हैदराबाद : माजी राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रवीण आणि त्यांच्या दोन भावांच्या अपहरणप्रकरणात सोमवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादावरून ५ जानेवारी रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. आंध्र प्रदेशच्या माजी मंत्री भूमा अखिला प्रिया यांंना ६ जानेवारी अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

प्रवीणच्या घराची झडती घेण्याच्या बनावट वॉरंटसह १५ लोक प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करून ५ जानेवारीच्या रात्री प्रवीणच्या बोवेपल्ली येथील घरात घुसले होते. घरात घुसल्यानंतर त्यांनी कुटुंबातील अन्य सदस्यांना घरातील दुसऱ्या खोलीत कोंडले, नंतर प्रवीण व त्याच्या दोन भावांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी प्रवीण आणि त्याच्या दोन भावांना फार्महाऊसवर नेले; परंतु व्यापक शोध मोहीम सुरू केल्याने धडगत नाही, असे वाटल्याने त्यांना ६ जानेवारी रोजी पहाटे नरसिंग येथे सोडून अपहरकर्ते पसार झाले. तेथून पोलिसांनी या तिघांची सुटका केली.

अपहरणात सामील असलेल्या तीन लोकांनी अखिला प्रियाच्या सांगण्यावरूनच आम्ही प्रवीणच्या घरावर पाळत ठेवून या गुन्ह्यात सहभागी झाल्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. अपहरणकर्त्यांनी ओळख लपविण्यासाठी सहा सीमकार्ड आणि एकाच नंबरचे सहा मोबाइल फोन खरेदी केले. यातील एक सीमकार्ड त्यांनी अखिल प्रिया यांना दिले. चौकशीत याप्रकरणात १९ लोकांची नावे समोर आली आहेत. भूमा अखिला प्रिया यांनी पती भार्गव रामच्या साथीने जमीन बळकाविण्यासाठी किंवा खंडणी उकळण्यासाठी या तीन भावांच्या अपहरणाचा कट रचला. भार्गव राम फरार आहे. हाफीजपेठ येथील २५ एकर जमिनीशी संबंधित हा वाद आहे. ही जमीन प्रवीणने २०१६ मध्ये खरेदी केली होती, असे हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Three more arrested in Hyderabad in kidnapping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.