आणखी तीन मुख्यमंत्र्यांनाही मिळाले कोट्यवधी?
By admin | Published: December 25, 2016 01:06 AM2016-12-25T01:06:47+5:302016-12-25T01:06:47+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री असताना सप्टेंबर २0१३मध्ये नरेंद्र मोदी सहारा उद्योग समूहाकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर त्याच दस्तावेजात काँग्रेस नेत्या
नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री असताना सप्टेंबर २0१३मध्ये नरेंद्र मोदी सहारा उद्योग समूहाकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर त्याच दस्तावेजात काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनाही पैसे मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेकांची नावे या यादीत आहेत.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री यांच्या नावांच्या नोंदी यादीत आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना २९ सप्टेंबर आणि १ आॅक्टोबर २0१३ रोजी पाच-पाच कोटी मिळून एकूण १0 कोटी दिल्याचे यादीत दिसते. या काळात भाजपा नेते शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना १ आॅक्टोबर रोजीच ४ कोटी दिल्याचे यादीत दिसते. या काळात भाजपा नेते रमनसिंह हे मुख्यमंत्री होते. भाजपाचे पदाधिकारी यांना १५ कोटी दिल्याची नोंद यादीत आढळते. मुंबई भाजपाच्या एका पदाधिकारी महिलेलाही ५ कोटी दिल्याचे यादीत दिसते. यादीनुसार, त्यांना चार टप्प्यांत पैसे दिल्याचा उल्लेख आहे. सप्टेंबर २0१३मध्ये तीन वेळा तर जानेवारी २0१४मध्ये एकदा हे पैसे अदा करण्यात आले.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानुसार, मोदी यांना सहारा उद्योग समूहाकडून सात वेळा प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळाले. तसेच दोन वेळा प्रत्येकी २.५ कोटी मिळाले. राहुल यांनी केलेल्या आरोपाला पुष्टी काँग्रेसने पोस्ट केलेल्या दस्तावेजातून मिळते. (लोकमत न्यूज नेटवर्क)