उत्तर भारतात थंडीचे आणखी तीन बळी
By admin | Published: December 30, 2014 11:46 PM2014-12-30T23:46:17+5:302014-12-30T23:46:17+5:30
उत्तर भारतातील तापमानात किंचित वाढ झाली असली तरी थंडीची लाट कायम असून उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात थंडीच्या लाटेमुळे आणखी तीन जण मृत्युमुखी पडले आहेत.
नवी दिल्ली : उत्तर भारतातील तापमानात किंचित वाढ झाली असली तरी थंडीची लाट कायम असून उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात थंडीच्या लाटेमुळे आणखी तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दाट धुक्यामुळे रेल्वे ,विमानसेवा तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोलमडली आहे.
अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली पण थंडीचा कहर कायम आहे. उत्तर भारतात दाट धुक्याची चादर पसरली असल्यामुळे दिब्रूगड, भुवनेश्वर आणि सियाल्दा येथून दिल्लीला येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससह शंभरावर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.
दिल्ली विमानतळावरील किमान २७ उड्डाणे रद्द करण्यात आली किंवा अन्य मार्गाने वळवण्यात आली आहेत. दिल्लीतील तापमान ४.५ अंश सेल्सिअसवर आले असून ते सर्वसामान्य तापमानापेक्षा कमी आहे. उत्तर प्रदेशातील नाझियाबाद येथे २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)