अजून तीन राफेल विमाने भारतात दाखल, जामनगर एअरबेसवर केलं दिमाखात लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 00:55 IST2021-04-01T00:54:18+5:302021-04-01T00:55:06+5:30
Rafale fighter planes : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी अजून तीन राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजता गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावर या विमानांनी दिमाखात लँडिंग केले.

अजून तीन राफेल विमाने भारतात दाखल, जामनगर एअरबेसवर केलं दिमाखात लँडिंग
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी अजून तीन राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजता गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावर या विमानांनी दिमाखात लँडिंग केले. फ्रान्समधून निघाल्यानंतर सलग उड्डाण करत ही विमाने भारतात पोहोचली आहेत. यादरम्यान या विमानांनी वाटेत यूएईच्या मदतीने एअर टू एअर रिफ्युएलिंग केले होते.
आज दाखल झालेल्या विमानांसोबतच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील एकूण राफेल विमानांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यापूर्वी ११ राफेल विमाने भारतात आली आहेत. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून ८ राफेल विमाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. याशिवाय राफेलचे ट्रेनर व्हर्जनसुद्धा भारतात येणार आहे. भारताने एकूण ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्ससोबत करार केला आहे.
The 4th batch of three IAF Rafales landed on Indian soil after a direct ferry from Istres Air Base France: Indian Air Force pic.twitter.com/tXyUeiCFgm
— ANI (@ANI) March 31, 2021
भारतात सध्या असलेली ११ राफेल विमानं अंबालामध्ये स्वॉड्रन १७ मध्ये दाखल आहेत. या विमानांना चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आलं आहे. भारत आता लवकरच स्वदेशी पद्धतीनं विकसीत झालेल्या स्टेल्थ फायटर्स अॅडवान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसोबतच ११४ मल्टीरोल लढाऊ विमानांची ऑर्डर देणार आहे.
हवाई दलाची ताकद वाढणार
चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाची ताकद वाढणं हे देशासाठी अतिशय महत्वाचं मानलं जात आहे. आज तीन राफेल लढाऊ विमानांची तुकडी भारतात पोहोचली आहेत. तिनही विमानं जामनगर एअरबेसवर दाखल होणार आहेत. यावेळी विमानांचं जोरदार स्वागत केलं जाईल.
फ्रान्स ते भारत असा तब्बल ७ हजार किमी प्रवास पूर्ण करत राफेल विमानं आज भारतात दाखल झाली आहेत. यूएईमध्ये या विमानांमध्ये 'एअर टू एअर' रिफ्यूलिंग देखील केलं. म्हणजेच यूएईमध्ये या तिनही विमानांमध्ये हवेतच इंधन भरलं गेलं.