‘रालोजपा’चे तीन खासदार जदयूमध्ये? बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 09:05 AM2022-08-14T09:05:54+5:302022-08-14T09:06:26+5:30
Bihar politics : रालोजपाचे तीन खासदार जदयूमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये महागठबंधन सरकार येताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या (रालेजपा) खासदारांवर जदयूची नजर आहे. रालोजपाचे तीन खासदार जदयूमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. चौधरी महेबूब अली कैसर, वीणा देवी व चंदन सिंह यांना जदयूमध्ये नेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
पारस यांचा पक्ष फोडण्यासाठी जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह सक्रिय आहेत. एनडीएला पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या जदयूने रालोजपा फोडण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे. हे तिघे केंद्रीय मंत्र्यांना केव्हाही धक्का देऊ शकतात, असे समजले जात आहे.
मागील वर्षी ‘लोजपा’मध्ये फूट पडली होती. पारस यांच्यासह पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंड केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पार्टीच्या दोन गटांना वेगवेगळी चिन्हे व नावे दिली होती.
चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करणाऱ्यांमध्ये त्यांचे काका पशुपती कुमार पारस, चुलत भाऊ प्रिन्स राज, चंदन सिंह, वीणा देवी व महेबूब अली कैसर यांचा समावेश आहे. चौधरी महेबूब अली कैसर यांचे पुत्र राजदचे आमदार आहेत.
१२ काँग्रेस आमदारांना हवीत मंत्रिपदे
काँग्रेसच्या १२ आमदारांनी मंत्रिपदे मागितली आहेत. तथापि, काँग्रेसच्या वाट्याला तीन ते चार पदे येऊ शकतात. काँग्रेसच्या आमदारांनी मंत्री होण्यासाठी बिहारचे प्रभारी भक्त चरण दास, प्रदेशाध्यक्ष डॉ. मदन मोहन झा यांच्यापासून ते पक्षश्रेष्ठीपर्यंत आपले दावे सादर केलेले आहेत. आघाडीतील नेत्यांसाेबत चर्चेनंतर मंत्रीवाटपाबाबत स्पष्टता येईल. १६ ऑगस्टला मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे, असे दास म्हणाले.