120 तासांत तीन राष्ट्रप्रमुखांच्या भेटी
By admin | Published: June 29, 2017 12:34 AM2017-06-29T00:34:28+5:302017-06-29T00:34:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारतात पोहोचले. त्यांनी १२0 तासांमध्ये पोर्तुगाल, अमेरिका व नेदरलँड या तीन देशांचा दौरा केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारतात पोहोचले. त्यांनी १२0 तासांमध्ये पोर्तुगाल, अमेरिका व नेदरलँड या तीन देशांचा दौरा केला आणि त्यासाठी त्यांनी तब्बल ३३ तास विमानात घालवले. उरलेल्या ६२ तासांत त्यांनी तिन्ही देशांच्या प्रमुखांची भेट तर घेतलीच, पण तिन्ही देशांमधील भारतीयांसमोर भाषणेही केली.
या दौऱ्यांत परदेशांमध्ये मुक्काम करण्याचे त्यांनी टाळले. त्या वेळेत त्यांनी विमानप्रवास केला. प्रत्येक देशांच्या प्रमाणवेळेनुसार ते आपल्या कामाचे तास वाढवितात, असे यापूर्वी आढळून आले आहे. यंदाही त्यांनी तसेच केले. लिस्बनहून वॉशिंग्टन व तेथून हेगला जाताना त्यांनी तसेच केले. त्यांनी दोन रात्री विमानप्रवासामध्येच घालवल्या.
मोदी २४ जून रोजी सकाळी ७ वाजता दिल्लीहून लिस्बनला जायला निघाले होते. तिथे १0 तासांनी पोाहचताच, त्यांनी जेवण घेतले आणि तेथील विदेश मंत्रालयात संबंधितांच्या त्यांनी भेटी घेतल्या. नंतर भारतीयांसमोर भाषण करून ते लगेच वॉशिंग्टनला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता ते तिथे पोहोचले. तेथील दोन दिवसांत त्यांनी १७ बैठका घेतल्या आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. ती आटोपल्यावर ते नेदरलँडला रवाना झाले. तिथे पंतप्रधान मार्क रुट यांची भेट व भारतीयांसमोर भाषण याबरोबरच तिथे काही भेटीगाठी झाल्यानंतर ते भारताकडे निघाले आणि गुरुवारी सकाळी ते पुन्हा दिल्लीत परतले.