जिराम खोरे हल्ल्यातील कमांडरसह ३ नक्षल्यांना अटक
By admin | Published: June 13, 2014 03:40 AM2014-06-13T03:40:53+5:302014-06-13T03:40:53+5:30
काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीत सहभागी ज्येष्ठ नेत्यांवर जिराम खोऱ्यात हल्ला करून खळबळ उडविणाऱ्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरसह तीन नक्षल्यांना पोलिसांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्णात अटक केली आहे.
रायपूर : गेल्या वर्षी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीत सहभागी ज्येष्ठ नेत्यांवर जिराम खोऱ्यात हल्ला करून खळबळ उडविणाऱ्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरसह तीन नक्षल्यांना पोलिसांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्णात अटक केली आहे.
काल रात्री दंतेवाड्यातील बचेली येथील आठवडी बाजारात हे तीन नक्षलवादी आले असताना, बिजापूर जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना अटक केल्याचे बिजापूरचे पोलीस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी सांगितले.
या भागात जहाल नक्षलवादी दडून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. चैतू लेकाम ऊर्फ मुन्ना (२५) हा पश्चिम बस्तरमधील माओवाद्यांच्या मिलिटरी कंपनी २ चा सेक्शन कमांडर असून, त्याच्यासोबत प्लाटून कमांडर आयतू पुनेम (३७),मंगू कुंजम (२४) या दोघांना अटक करण्यात आली.
२००७ पासून सक्रिय
भाकप (माओवादी) चळवळीतील चैतू लेकाम हा २००७ पासून जिराम खोऱ्यात सक्रिय आहे. गेल्या वर्षी काँग्रेस नेत्यांवर हल्ला करण्यात त्याचा मुख्य सहभाग होता. २००८ मध्ये बिजापूर भागातील मीरतूर येथे त्याने केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस शहीद झाले.
सुकमा भागातील चिंतागुफा पोलीस ठाण्यावर त्याने २००९ मध्ये हल्ला केला होता. बचेली येथील सीआयएसएफच्या चौकीवर २०१२ मध्ये केलेल्या हल्ल्यात दोन जवान मारले गेले. (वृत्तसंस्था)