अरुणाचल सीमेलगत चीनची तीन नवीन गावे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:04 AM2020-12-07T05:04:19+5:302020-12-07T05:05:24+5:30
India-China News : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
नवी दिल्ली : प्रत्यक्ष ताबा रेषेवर लडाखजवळ लष्करी तणाव सुरू असतानाच चीनने आता अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर नवीन कुरापत काढली आहे. या ठिकाणी तीन नवीन गावे चीनने वसवली असून तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांचे भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर पुनर्वसन करण्यासाठीही चीन प्रयत्नशील आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाप्रदेशात आपल्या हद्दीत तीन नवीन गावे वसविल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी ही तीन नवीन गावे वसविण्यात आली आहेत ते ठिकाण भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा जिथे एकत्र येतात त्या बुम ला खिंडीपासून अवघे पाच किमी अंतरावर आहे.
२०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाम पठाराच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता. तीन महिने चाललेल्या या तणावानंतर उभय सैन्यांनी माघार घेतली. मात्र, अलीकडेच या डोकलाम पठारापासून नजीक भूतानच्या हद्दीत चीनने एक संपूर्ण गाव वसविल्याचे समोर आले. उल्लेखनीय म्हणजे चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट प्रांत मानतो. या प्रांताला खेटूनच ६५ हजार चौरस किमी परिसरावर चीन आपला हक्क सांगत असतो. या पार्श्वभूमीवर चीनने तीन नवीन गावे वसविणे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट सुविधाही उपलब्ध
या तीनही गावांमध्ये वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट या पायाभूत सुविधाही चीनने उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांना सीमारेषेवरील परिसरात राहण्यासाठी आणले जात आहे.दरम्यान, २०१७ मध्ये डोकलाम वाद निवळल्यानंतर चीन अरुणाचल प्रदेश सीमारेषेवर कुरापती काढण्याची शक्यता आहे, असा इशारा तीनही सेनादलांचे संयुक्त प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी दिला होता.
वादग्रस्त सीमारेषांवर हानवंशीय वा तिबेटमधील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांची वस्ती निर्माण करायची आणि हळूहळू तेथील भूभाग काबीज करायचा, ही चीनची जुनीच खेळी आहे.
- ब्रह्मा चेलानी, चीन विश्लेषक