तीन पाक घुसखोरांना कंठस्नान
By Admin | Published: July 13, 2016 02:55 AM2016-07-13T02:55:47+5:302016-07-13T02:55:47+5:30
भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अजनाला क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत तीन पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले
अमृतसर : भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अजनाला क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत तीन पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले. अमृतसरपासून २६ कि.मी. अंतरावर मंगळवारी पहाटे ही घटना घडली.
तीन पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत घुसल्याचे बीएसएफच्या गस्ती पथकाला आढळून आले. पथकाने त्यांना शरणागती पत्करण्याचा इशारा दिला. मात्र, इशारा न जुमानता ते जवानांच्या दिशेने चालत आले आणि गोळीबार केला. त्यानंतर, उडालेल्या चकमकीत तिन्ही घुसखोर ठार झाले, अशी माहिती बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली.
एकूण पाच जणांनी घुसखोरी केली होती. त्यातील तिघे मारले गेले, तर दोन जण पाकच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले, असेही हा अधिकारी म्हणाला.
ठार करण्यात आलेल्या घुसखोरांजवळ दोन मोबाइल आणि भारतीय चलन आढळून आले. बीएसएफचे (पंजाब फ्रंटियर) महानिरीक्षक अनिल पालीवाल आणि इतर अधिकारी घटनास्थळी आले आहेत. तिन्ही घुसखोर विशीतील होते. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तिघांच्याही अंगात पारंपरिक कपडे होते. भारत-पाक सीमेवरील दरिया मन्सूर सीमा चौकीजवळ ही घटना घडली.