तबरेज अन्सारी हत्या प्रकरणात ११ जणांवर खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:44 AM2019-09-20T04:44:23+5:302019-09-20T04:44:27+5:30
अन्सारी याला ठार मारण्याच्या प्रकरणाचा खटला कमजोर केला जात असल्याचे आरोप झाल्यानंतर झारखंड पोलिसांनी आपल्या मूळ भूमिकेपासून घूमजाव केले आहे.
रांची : तबरेज अन्सारी याला ठार मारण्याच्या प्रकरणाचा खटला कमजोर केला जात असल्याचे आरोप झाल्यानंतर झारखंड पोलिसांनी आपल्या मूळ भूमिकेपासून घूमजाव केले आहे. या प्रकरणातील ११ आरोपींवर खुनाचा आरोप ठेवून पुरवणी आरोपपत्र सादर केले.
या प्रकरणात कालांतराने पकडलेल्या दोन आरोपींवरही खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तबरेज अन्सारी हा गंभीर जखमी झाल्यामुळे नव्हे, तर तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावल्याचे पोलिसांनी आधी म्हटले होते. मात्र, फोरेन्सिकच्या ताज्या अहवालानंतर पोलिसांनी आपली भूमिका बदलली.
पुणे येथे वेल्डर म्हणून काम करणारा तबरेज अन्सारी झारखंडमधील सराईकेला जिल्ह्यातील कडमदिया या आपल्या गावी आला होता. १७ जूनला रात्री धाटकिविध या शेजारील गावातील काही लोकांनी तबरेजला त्याच्या घरातून खेचून बाहेर काढले. चोरीचा आरोप करीत रात्रभर त्याला जबर मारहाण केली. हल्लेखोरांनी तबरेजला जबरदस्तीने ‘जय हनुमान’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणाही द्यायला लावल्या.
>सत्य उजेडात
झारखंड पोलीस मुख्यालयाने म्हटले आहे की, तबरेज अन्सारीची शवचिकित्सा झाल्यानंतर त्याच्या व्हिसेराचा अहवाल पहिले आरोपपत्र दाखल करेपर्यंत पोलिसांच्या हाती आला नव्हता. तबरेजला वजनदार वस्तूंनी मारहाण करण्यात आली. त्या धसक्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे ताज्या फोरेन्सिक अहवालात म्हटले आहे.