भीषण चकमकीत तीन पोलीस शहीद
By admin | Published: May 18, 2015 02:43 AM2015-05-18T02:43:26+5:302015-05-18T02:43:26+5:30
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यादरम्यान उडालेल्या भीषण चकमकीत तीन पोलीस जवान शहीद
रायपूर/गया : छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यादरम्यान उडालेल्या भीषण चकमकीत तीन पोलीस जवान शहीद झाले. यावेळी दोन नक्षलवाद्यांनाही ठार मारण्यात पोलिसांना यश आले. एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे.
मिरतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दाट जंगलातील जप्पीमारका गावाजवळ रविवारी सकाळी ही चकमक उडाली. एसटीएफ व जिल्हा पोलीस दलाचे संयुक्त पथक गंगालोर व मिरतूरच्या जंगलात नक्षलविरोधी आॅपरेशन राबवित असताना त्यांचा नक्षल्यांशी सामना झाला. पोलीस पथक मिरतूर येथे पोहोचताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. ही चकमक तब्बल दोन तासपर्यंत चालली. त्यानंतर नक्षली जंगलात पळून गेले. या चकमकीत एसटीएफचा कॉन्स्टेबल सीताराम कुंजाम व जिल्हा पोलीस राखीव दलाचा असिस्टंट कॉन्स्टेबल मोतीराम (२८) असे दोघे जण शहीद झाले. (वृत्तसंस्था)