उत्तर प्रदेशच्या तीन साधूंवर जमावाकडून संशयातून हल्ला, पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील खळबळजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 09:32 AM2024-01-14T09:32:46+5:302024-01-14T09:33:00+5:30
ही घटना गुरुवार, ११ जानेवारीला घडल्याचे सांगण्यात येत आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हे साधू मकर संक्रांतीनिमित्त गंगासागरला चालले होते. त्यांच्या भाषेमुळे गफलत झाल्याने ते मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय लोकांना आला. त्यातून ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवार, ११ जानेवारीला घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुरुलियाचे पोलिस अधीक्षक अविजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, हे साधू भाड्याच्या बोलेरो गाडीतून चालले होते. गौरांगडीतील काली मंदिराजवळ त्यांनी तीन मुलींना रस्ता विचारला. तथापि, भाषा भिन्नतेमुळे मुलींना वाटले की ते आपला पाठलाग करीत आहेत.
पालघरची पुनरावृत्ती, भाजपचा आरोप
भाजप प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी सांगितले की, ही घटना पालघर भाग-२ आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्येच अशीच घटना घडली होती. पश्चिम बंगालच्या मंत्री तथा तृणमूल नेत्या शशी पांजा यांनी सांगितले की, तीन मुलींना पळविण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून हा प्रकार झाला आहे. भाजप घटनेला चुकीचे वळण देत आहे.
मुलीनी आरडाओरडा केला. त्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी साधूंना वाचविले. या प्रकरणी १२ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.