फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 3 जण NIAच्या ताब्यात
By admin | Published: June 28, 2017 10:14 AM2017-06-28T10:14:49+5:302017-06-28T10:48:47+5:30
काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयासहीत तीन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं बुधवारी (28 जून) ताब्यात घेतले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 28 - काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयासहीत तीन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं बुधवारी (28 जून) ताब्यात घेतले आहे. अयाज अकबर, अलताफ शाह आणि मेहराज उद्दीन कलवल या तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेनं ताब्यात घेतले आहे.
हे तिघंही हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते आहेत. अलताफ शाह हा गिलानी यांचा जावई आहे. काही दिवसांपूर्वी "एनआयए"नं या सर्व हुर्रियत नेत्यांच्या घरावर छापा मारला होता. या तिघांनाही बुधवारी (28 जून) नवी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी पाकिस्तानकडून मिळणा-या आर्थिक मदतीसंबंधी "एनआयए"नं तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास संस्था जम्मू काश्मीरमधील हिंसक कारवायांमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या भूमिकांबाबत तपासणी करत आहे. NIA काश्मिरी फुटीरतावादी नेता नईम खानविरोधातही दहशतवादी संघटनांकडून पैसे घेण्यासंबंधी तपास करत आहे. एक खासगी वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नईम खान दहशतवादी संघटनांकडून पैसे घेत असल्याची बाब स्वीकारत असल्याचे दाखवण्यात आले होते.
जम्मू काश्मीरमध्ये जुलै 2016मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीर खो-यातील हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे. वर्षभरात काश्मीर खो-यात झालेल्या हिंसक घटनांमध्ये जवळपास 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. शिवाय, दगडफेकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दगडफेकीत शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही समावेश आहे. गिलानींसहीत अन्य फुटीरतावादी नेत्यांवर आरोप आहेत की, ते पाकिस्तान आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून आर्थिक रसद घेऊन काश्मीर खो-यात अशांतता पसरवण्यास मदत करत आहेत. मात्र फुटीरतावादी नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Police in Srinagar have detained three Hurriyat (G) leaders who were to be questioned by NIA in Delhi. pic.twitter.com/DWcrx46aqv
— ANI (@ANI_news) June 28, 2017