लोकसभेबरोबर महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका? भाजपाची चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:52 AM2018-12-25T06:52:37+5:302018-12-25T06:52:52+5:30
लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेता येतील का याची चाचपणी भाजपाने सुरू केली आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेता येतील का याची चाचपणी भाजपाने सुरू केली आहे. एकत्र निवडणुकांचे पक्षाच्या कामगिरीवर कोणते बरेवाईट परिणाम होऊ शकतात याचा अभ्यासही सुरू केला आहे.
या तीन राज्यांमध्ये पुढील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होतील. दोन्ही
निवडणुका एकत्र घेतल्यास ते पक्षाला कितपत फायदेशीर ठरेल याविषयी विचारमंथन सुरू आहे.
झारखंड, हरयाणामध्ये भाजपाचे स्वबळावर सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ व शिवसेनेला ६३ जागांवर विजय मिळाला होता. त्यांचे युतीचे सरकार राज्यात सत्तेत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाशी युती केली होती. मात्र विधानसभेत दोघे स्वतंत्रपणे लढले होते.
भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात सत्तेवर आहे, ही सल शिवसेनेच्या मनात आहे. लोकसभेबरोबर तीन राज्यांतील निवडणुका घेतल्या व पुन्हा मोदीलाट आल्यास भाजपाला पूर्वीपेक्षा मोठा विजय मिळेल असे पक्षातील काही धुरिणांना वाटत आहे. या निवडणुकांत सेनेबरोबर युती करावी असेही काही भाजपा नेत्यांना वाटते. झारखंडमध्ये झारखंड विकास मोर्चाचे बाबुलाल मरांडी यांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. झारखंडच्या ८१ सदस्य असलेल्या विधानसभेत मरांडींच्या पक्षाचे आठ आमदार होते. त्यातील सहा आमदार भाजपाने फोडल्याने मरांडी नाराज आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसच्या आघाडीमध्ये मरांडी यांनी सामील होऊ नये यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.
सेनेला मुख्यमंत्री पद देण्यास विरोध
महाराष्ट्रात शिवसेना दूर जाणे भाजपाला परवडणारे नाही. पक्षाच्या कोअर ग्रुपमधील एका नेत्याने निराळा सूर लावला. त्याने सांगितले की, भाजपाने महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद कधीही शिवसेनेला देऊ नये. त्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याची
गरज नाही. मात्र एनडीए मजबूत करण्याची वेळ आली आहे, असा संदेश
अमित शहा यांनी दिल्याचेही तो म्हणाला.