तीन राज्यांत मुसळधार : आसामात दरडी कोसळून १० ठार
By admin | Published: May 19, 2016 04:26 AM2016-05-19T04:26:52+5:302016-05-19T04:26:52+5:30
उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे.
गुवाहाटी/ चेन्नई/ भुवनेश्वर : उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे. हवामान विभागाने येत्या
४८ तासांत आणखी एक-दोन राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
आसामच्या बराक खोऱ्यातील करीमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळून १० जण ठार झाले. अरुणाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासूनच्या जोरदार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आल्यामुळे हाहाकार उडाला. हवामान विभागाने तामिळनाडू आणि ओडिशा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्य भागात केंद्रित झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये बुधवारी तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता असून, उत्तर किनारपट्टीसह पुद्दुचेरीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
>ओडिशामध्ये चक्रीवादळाबाबत सतर्कता...
ओडिशाच्या गोपालपूरपासून आग्नेयेकडे ७८० किमी. अंतरावर बंगालच्या उपसागरालगत कमी दाबाचा पट्टा केंद्रित झाला असून, हवामान विभागाने प्रथमच चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून उत्तर आणि ईशान्येकडे सरकत जाणार असून, २४ तासांत वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल. पुढील ४८ तासांत ते उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकलेले असेल.
चेन्नईत एनडीआरएफच्या चार चमू ... तामिळनाडूत चेन्नईच्या पश्चिमेकडे ९० किमी, तर पूर्वेकडे ७० किमी. अंतरावर कमी दाबाचा पट्टा सरकलेला राहील. त्याची परिणती तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि लगतच्या पुद्दुचेरीमध्ये येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यात होऊ शकते. चेन्नईच्या सखल भागात एनडीआरएफचे चार चमू दाखल झाले आहेत.
अरुणाचलमध्ये तीन गावे पुराखाली... गेल्या काही दिवसांपासून अरुणाचलमध्ये संततधार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आला असून, नामसाई जिल्ह्यांतील महादेवपूर-१, महादेवपूर-४ आणि काकोनी ही गावे पाण्याखाली आली आहेत. धानाची पिकेही बुडाली आहेत. १० मे रोजी
बाबूंची पाच घरे वाहून गेली होती.
आंध्र किनाऱ्यावर चक्रीवादळाची शक्यता
आंध्र प्रदेशच्या दक्षिण आणि उत्तर भागांतील किनाऱ्यांवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली असून, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सर्व ठिकाणी होईल, हे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे, असे सांगून नायडू म्हणाले की, ‘परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार जिल्हा प्रशासनांना सूचना आणि मदत देण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.’