अमरनाथ हल्ल्यामागील 3 दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 06:33 PM2017-08-06T18:33:27+5:302017-08-06T18:33:36+5:30

गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे.

Three terrorists arrested in Amarnath attack | अमरनाथ हल्ल्यामागील 3 दहशतवाद्यांना अटक

अमरनाथ हल्ल्यामागील 3 दहशतवाद्यांना अटक

googlenewsNext

जम्मू-काश्मीर, दि. 6 - गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी आज याबाबतची माहिती दिली. अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असून, या हल्लाचा मास्टर माईंड अबू इस्माईल आणि इतर तीन दहशतवादी अजूनही फरार आहेत. विशेष म्हणजे, यातील दोन दहशतवादी पाकिस्तानचे, तर एक काश्मिरी आहे.
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची बस होती. सुरुवातीला हा हल्ला 9 जुलै रोजी घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मानस होता. पण त्या दिवशी सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची कोणतीही बस अमरनाथला जाणाऱ्या मार्गावरुन गेली नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी दुसऱ्याच दिवशी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यामागील तिन्ही आरोपींना पकडण्यात आले असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. यात्रेकरूंच्या बससाठी दहशतवाद्यांनी शौकत आणि सीआरपीएफच्या गाडीसाठी बिलाल हा कोडवर्ड वापरला होता, हा पूर्णपणे दहशतवादी हल्लाच होता असेही मुनीर यांनी सांगितले.
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते. या हल्ल्या मागे पाकिस्तानचा दहशतवादी मौलाना मसूद अजहर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण, मसूदनं काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ प्रसारित केला होता. त्या टेपद्वारे भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचे संकेत दिले होते.

नियमांचे उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रापूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.

१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांड
अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.

Web Title: Three terrorists arrested in Amarnath attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.