Jammu and Kashmir : 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 10:26 AM2019-03-25T10:26:02+5:302019-03-25T10:48:38+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे.
श्रीनगर - भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादीजैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात रविवारी (24 मार्च) पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. कारच्या तपासणीसाठी या तिघांना श्रीनगरच्या बाहेर परिमपोरा नाक्यावर थांबवण्यात आले. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचं समोर आलं. तीनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळत मिळाली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे.
Jammu & Kashmir Police: Three terrorists affiliated with the proscribed terror outfit Jaish-e-Mohammed (JeM) were arrested today based on a credible input. Incriminating material including ammunition & live rounds recovered. A case has been registered. pic.twitter.com/wbJvCgD4zg
— ANI (@ANI) March 24, 2019
जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये रविवारी भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. भारतीय सुरक्षादलांनी अखनूर सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्धवस्त केले आहे. पाकिस्तानने हा तळ अत्यंत गोपनीयरित्या उभारला होता. भारतीय लष्कराकडून पुरावा म्हणून याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा तळ दिसत आहे. तसेच त्यावर पाकिस्तानचा झेंडाही दिसून येत आहे.
#WATCH Indian Army video of Pakistani base destroyed in Indian firing in Akhnoor sector(J&K), Army sources say upside down Pakistan flag a signal for SOS (extreme danger/distress) pic.twitter.com/2srna7kS7P
— ANI (@ANI) March 24, 2019
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात रविवारी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला. हरी वाकेर असं या जवानाचं नाव असून ते गंभीर जखमी झाले होते. वाकेर यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (24 मार्च) मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (22 मार्च) चकमक सुरू झाली होती. या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी सडेतोड उत्तर देत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले.
आई-वडिलांच्या आर्त विनवणीनंतरही दहशतवाद्यांनी मुलाला ठार केलं
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचे क्रुर कृत्य पुन्हा एकदा समोर आलेले आहे. काश्मीरच्या शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये या भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये अनेक दिवसांपासून चकमकी होत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी क्रुर कृत्य केलं. 12 वर्षाच्या मुलाला ओलीस ठेवून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. त्या मुलाच्या आई-वडिलांनी आर्त विनवणी करत आपल्या मुलाची सुटका करावी अशी हात दहशतवाद्यांना देत होते. मात्र आई-वडिलांच्या विनवणीनंतरही दहशतवाद्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अखेर त्या मुलाची दहशतवाद्यांनी हत्या केली. बांदीपोरा जिल्ह्यातील मीर मोहल्ला येथे 2 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याच दहशतवाद्यांनी मुलाला ओलीस ठेवले होते. तर आणखी एका ओलीस ठेवलेल्या नागरिकाला सोडविण्यात पोलिसांना यश आलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचाही समावेश आहे. शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.