काश्मीरमध्ये ३ अतिरेकी ठार, बँकेच्या व्हॅनवर हल्ला, दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 05:20 AM2017-12-12T05:20:01+5:302017-12-12T05:20:01+5:30
उत्तर काश्मीरमधील हंडवारा भागात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्या वेळी एक महिला ठार झाली. तीनही अतिरेकी पाकिस्तानचे होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील हंडवारा भागात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्या वेळी एक महिला ठार झाली. तीनही अतिरेकी पाकिस्तानचे होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
दुसरीकडे दक्षिण काश्मीरमधील केलर येथे एका बँकेच्या व्हॅनवर हल्ला करताना अज्ञात इसमांनी जो गोळीबार केला, त्यात व्हॅनमध्ये असलेले दोन सुरक्षारक्षक ठार झाले. हा हल्ला दहशतवाद्यांनीच केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांचा शोध सुरू आहे. हंडवारा उनिसू गावात अतिरेकी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधसत्र सुरू केले होते. अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे अतिरेकी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते.
हुरियत कॉन्फरन्समध्ये फूट
हुरियत कॉन्फरन्सचा एक भाग असलेल्या मुस्लीम कॉन्फरन्समध्ये फूट पडली आहे. केंद्र सरकारचे विशेष दूत दिनेश्वर शर्मा यांची भेट घेतल्याबद्दल ज्येष्ठ नेते व फुटीरवादी नेते अब्दुल गनी भट यांची हकालपट्टी करण्यात आली. हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाईज उमर फारुख यांना लिहिलेल्या पत्रात मुुस्लीम कॉन्फरन्सने म्हटले आहे की, कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी मुहम्मद सुलतान मगरी यांची सहा महिन्यांसाठी निवड केली आहे. भट यांनी शर्मा यांची गुप्त भेट घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला. (वृत्तसंस्था)