'ती' भिंत कोसळल्यानं झालेल्या जीवितहानीमुळे तामिळनाडूतील 3 हजार दलित करणार धर्मांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:39 AM2019-12-29T01:39:18+5:302019-12-29T06:30:30+5:30
इस्लाममध्ये प्रवेश; अस्पृश्यतेच्या भिंतीमुळे १७ जणांचा मृत्यू
कोइम्बतूर : अस्पृश्यतेचा फटका बसलेल्या नाडूर गावातील तीन हजार दलितांनी इस्लाममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी दोन हजार दलित येत्या ५ जानेवारी रोजी हे धर्मांतर करणार आहेत. त्या गावात २ डिसेंबर रोजी झालेल्या पावसात भिंत कोसळून १७ जण ठार झाले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्या गावातील शिवसुब्रमण्यन याने आपल्या शेजारी दलितांची घरे असू नयेत, म्हणून मध्येच एक भिंत बांधली होती. ती भिंत बांधताना पुरेशी काळजी घेतली नाही आणि २ डिसेंबरच्या पावसात ती भिंत कोसळली. त्याखाली दबून दलितांच्या तीन कुटुंबातील १७ जण ठार झाले होते. तेव्हापासून तिथे वाद चिघळला आहे.
ही भिंत बांधणाऱ्या शिवसुब्रमण्यन याला पोलिसांनी अटक केली; पण त्याची काही दिवसांत जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, दुर्घटनेबद्दल आवाज उठवणाºया नागई तिरुवल्लूवन या स्थानिक दलित नेत्याला मात्र अद्यापही कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाडूर व आसपासच्या गावांतील दलित संतप्त आहेत. अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तीला अॅट्रॉसिटी कायद्याखाली अटक करण्याऐवजी आमच्याच नेत्याला पोलिसांनी डांबून ठेवले आहे, अशी त्यांची तक्रार आहे. शिवसुब्रमण्यनवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही वारंवार केली; पण राज्य सरकार व पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. धर्मांतर करू इच्छिणारे बहुसंख्य दलित हे तामिळ पुळीगल कच्ची संघटनेचे सदस्य आहेत, तसेच ज्या कुटुंबांतील १७ जण भिंत कोसळून ठार झाले, तेही इस्लाममध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. (वृत्तसंस्था)
या धर्मात आम्हाला स्थानच नाही
तामिळ पुळीगल कच्ची या संघटनेचे सरचिटणीस इलावेन्नील म्हणाले की, भिंत कोसळून १७ जण मरणे ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती. आमच्या जीवनाला हिंदू धर्मात काही किंमतच नसेल तर आम्ही या धर्मात राहायचे तरी का? हिंदू धर्माला आमची काळजी नसेल, तर आम्हालाही त्या धर्मात राहण्याची इच्छा नाही.