जलीकट्टूचे तीन बळी
By admin | Published: January 23, 2017 01:07 AM2017-01-23T01:07:07+5:302017-01-23T01:07:07+5:30
तामिळनाडूच्या विविध भागात रविवारी जलीकट्टूचे (बैलांचा खेळ)आयोजन करण्यात आले होते. यात पडुकोट्टईत दोन जणांचा तर
चेन्नई / मदुराई : तामिळनाडूच्या विविध भागात रविवारी जलीकट्टूचे (बैलांचा खेळ)आयोजन करण्यात आले होते. यात पडुकोट्टईत दोन जणांचा तर अन्य एका ठिकाणी एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, आंदोलकांचा उग्र पवित्रा लक्षात घेता मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे आलंगनल्लूर येथील जलीकट्टूचे उद्घाटन न करताच चेन्नईला निघून गेले.
मदुराईत रविवारी आंदोलक आक्रमक झाले होते. तात्पुरती कायदा दुरुस्ती आंदोलकांना अमान्य असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, जलीकट्टूच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या आलंगनल्लूर येथे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम जाणार होते पण, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून ते परत गेले.
पोलिसांनी सांगितले की, रापूसल येथे जलीकट्टूच्या कार्यक्रमादरम्यान एका बैलाने हल्ला केल्याने दोन लोकांचा मृत्यू झाला. तर, २८ जण जखमी झाले आहेत. तर, जयहिंदपुरम येथील ४८ वर्षीय चंद्रमोहन यांचा शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाला. मदुराईत जलीकट्टूच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. चेन्नईच्या मरीना बीचवर अद्यापही आंदोलक आहेत. सहा दिवसांपासून मरीना बीच आंदोलनाचे केंद्र झाले आहे. पशु अधिकार संघटना पेटावर बंदी आणावी आणि या प्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. दरम्यान, चेन्नईत परतण्यापूर्वी मदुराईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पनीरसेल्वम म्हणाले की, जलीकट्टूवरील बंदी हटविण्यात आली आहे. आलंगनल्लूर येथे स्थानिक नागरिकांकडून या खेळाचे आयोजन करण्यात येईल.