पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या तीन, भाजपच्या महिला कार्यकर्त्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 03:15 AM2019-06-16T03:15:05+5:302019-06-16T03:15:38+5:30
राजकीय हिंसाचार अद्याप सुरूच
कोलकाता : पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकांपासून सुरू झालेला हिंसाचार थांबायला तयार नाही. येथील मुर्शिदाबाद जिल्ह्यात काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली आणि त्यानंतर फेकण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊ न तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते ठार झाले. राज्यात गेल्या काही दिवसांत राजकीय हिंसाचारांमध्ये १३ जण मरण पावले आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आमच्या घरावर बॉम्ब फेकला, असा आरोप ठार झालेल्या खैरुद्दीन शेख (५५) यांच्या मुलाने केला आहे. या बॉम्बहल्ल्यात तृणमूलचा १९ वर्षांचा सोहेल राणा हा कार्यकर्ताही ठार झाला आहे. बॉम्बहल्ला झाला, तेव्हा आम्ही घरात झोपलो होतो, असे शेख याच्या मुलाने सांगितले. ठार झालेल्या तिसऱ्या कार्यकर्त्याचे नाव समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी माझे काका अल्ताफ हुसेन यांनाही ठार मारण्यात आले होते, असे शेखच्या मुलाने सांगितले. काल बॉम्बहल्ल्यात मरण पावलेला सोहेल राणा हा अल्ताफ हुसेन यांचा मुलगा आहे. (वृत्तसंस्था)
घरात घुसून गोळ्या झाडल्या
या घटनेच्या आधी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या सरस्वती दास या महिला कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. ती हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली, असा आरोप भाजपने केला आहे.
सरस्वती दास या बशीरघाटच्या हस्नाबाद येथे राहत. गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे पती संध्याकाळी कामावरून घरी आले, तेव्हा त्यांना पत्नीचा मृतदेह दिसला. या हत्येशी आमचा अजिबात संबंध नसल्याचा दावा तृणमूलने केला आहे.