बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:58 IST2025-04-07T19:57:05+5:302025-04-07T19:58:52+5:30
बोरीवलीमध्ये बेस्ट बसच्या धडकेत एका तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला

बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू
Mumbai Accident: मुंबईतून पुन्हा बेस्ट बस अपघाताची हादरवणारी घटना समोर आली आहे. बोरीवलीत बेस्ट बसच्या धडकेत एका तीन वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. बोरिवलीच्या राजेंद्र नगरमध्ये दुपारी १२.४० च्या सुमारास हा अपघात झाला. मागठाणे आगाराची बेस्टची बस बोरिवली स्थानकातून मागठाणे आगाराच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना अचानक चिमुकली बससमोर आली. त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बेस्टच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरकडून देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, बोरिवलीतील राजेंद्र नगरजवळ ए-३०१ मार्गावर धावणाऱ्या बेस्ट वेटलिज बसचा अपघात झाला. बस राजेंद्र नगर येथे आली असता, मेहक खातून शेख ही तीन वर्षीय मुलगी रस्ता ओलांडत असताना अचानक बससमोर आली. बसला धडक दिल्यानंतर मुलीचे डोके टायरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच पोलिसांनी मुलीला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मुलीला एक वाजता मृत घोषित केले.
अपघातग्रस्त बसमध्ये चालकाशिवाय कोणी नव्हते. बस चालक प्रकाश दिगंबर कांबळे (४८) ही बस चालवत होते. मुलगी अचानक रस्त्यावर आली. त्यावेळी चालकाने बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती बसच्या चालाखाली आली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून करत चौकशी सुरू केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी कुर्ला येथे झालेल्या अपघाता नऊ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
कांदिवलीमध्ये दोन महिलांना टेम्पोची धडक
दुसरीकडे, कांदिवलीमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांना शनिवारी भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने धडक दिली होती. या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरातून काही वस्तू खरेदी करण्यासाठी निघालेल्या महिला रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने महिलांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पोचालकाला अटक केली.