कठुआ बलात्कार व खून खटल्यात तिघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 02:58 AM2019-06-11T02:58:59+5:302019-06-11T02:59:29+5:30
तीन पोलिसांनाही कैद : आठ वर्षांच्या पीडितेस मरणोत्तर न्याय
पठाणकोट : संपूर्ण देशात ज्यामुळे संतापाची लाट उसळली होती त्या जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या मुलीच्या बलात्कार व खून खटल्यात न्यायालयाने सोमवारी तीन मुख्य आरोपींना जन्मठेप व तीन पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या घटनेला आलेला राजकीय रंग व स्थानिक वकिलांचा बहिष्कार यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खटला पंजाबमधील पठाणकोट येथे चालविण्याचा आदेश दिला होता.
सत्र न्यायाधीश तेजविंदर सिंग यांनी निकाल सोमवारी सकाळी जाहीर करताना सातपैकी सहा आरोपींना दोषी धरले. शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. खटल्याचे कामकाज ‘इन कॅमेरा’ चालले. नंतर वकिलांनी बाहेर आल्यावर निकालाची माहिती दिली. कठुआच्या रसाना गावात माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा घडला. गावप्रमुख व माजी अधिकारी सांझीराम जनगोत्रा, पुतण्या प्रवेश कुमार व पोलीस अधिकारी दीपक खजुरिया या तिघांना कट रचणे, सामूहिक बलात्कार व खून या गुन्ह्यांसाठी जन्मठेप ठोठावण्यात आली. सांझीराम व त्याच्या बहिणीकडून अनुक्रमे तीन लाख व दीड लाख रुपयांची लाच घेऊन प्रकरण दडपून टाकू पाहणारे पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्त वर्मा, जमादार तिलक राज व पोलीस अधिकारी सुरिंदर कुमार वर्मा यांना पाच वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली.
सांझीरामचा मुलगा विशाल जनगोत्रा हाही आरोपी होता. परंतु ही घटना घडली तेव्हा आपण उत्तर प्रदेशमध्ये मुजफ्फरनगरला परीक्षा देत होतो, हा बचाव मान्य करून न्यायालयाने त्यास निर्दोष मुक्त केले. गेल्या वर्षी ३१ मेपासून खटल्याची रोज सुनावणी झाली. आरोपींनाही गुरदासपूर कारागृहात ठेवले होते. विशेष म्हणजे १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची तरतूद करणारा वटहुकूम काश्मीर सरकारने या घटनेनंतर काढला. धार्मिक द्वेषाचे पाशवी कृत्य पीडित मुलगी बक्करवाल या भटक्या मुस्लीम समाजातील होती. काश्मीर पोलिसांच्या तपासी पथकाच्या आरोपपत्रानुसार या समाजाचा मुक्काम कठुआ जिल्ह्यात असताना त्यांच्याकडून काही हिंदू मुलांना मारहाण झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी बलात्काराचा कट रचला गेला. कुरणांत घोडे चरायला घेऊन गेलेल्या मुलीचे अपहरण केले गेले. तिला गुंगी आणणारे औषध पाजून रसाना गावातील सांझीराम यांच्या मालकीच्या देवळात आठवडाभर डांबले. या काळात तिच्यावर वारंवार बलात्कार केले आणि नंतर गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केल्यावर तिचा मृतदेह बाहेर फेकून देण्यात आला.
सरकारमध्ये आले वितुष्ट
या घटनेला धामिक व राजकीय रंग दिला गेला. गावकऱ्यांच्या विरोधामुळे मुलीचा दफनविधी आठ किमी दूर करावा लागला. त्यानंतर तो भटका समाज जिल्हा सोडून निघून गेला. त्यावेळी काश्मीरच्या सरकारमधील चौधरी लाल सिंग व चंदर प्रकाश गंगा या भाजपच्या मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन केले होते. वकिलांनाही असहकार पुकारून पोलिसांना आरोपपत्र दाखल करू दिले नाही. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली होती.