लडाखमधील हिमस्खलनात तीन जवान मृत
By Admin | Published: April 8, 2017 12:20 AM2017-04-08T00:20:41+5:302017-04-08T00:20:41+5:30
जम्मू आणि काश्मीरच्या लडाख भागात गुरुवारी हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या तीन सैनिकांचे मृतदेह लष्कराला शुक्रवारी सापडले.
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या लडाख भागात गुरुवारी हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या तीन सैनिकांचे मृतदेह लष्कराला शुक्रवारी सापडले. या जवानांची लष्करी चौकी बर्फाखाली दबली होती. लडाखच्या बटालिक सेक्टरमध्ये काल मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. त्यामुळे अनेक वेळा हिमस्खलन झाले. हिमस्खलनात लष्करी चौकी बर्फाखाली दबून पाच जवान अडकले होते. दोघांची काल सुटका करण्यात आली. मात्र, हवालदार प्रभू किर्के (४३), लान्स नायक बिहारी मरांडी (३४) आणि शिपाई कुलदीप लकडा (२२) यांचा शोध लागला नव्हता. आज त्यांचे मृतदेह आढळून आले. हे तिघेही झारखंडचे रहिवासी होते.
आज कारगिल जिल्ह्याच्या काकसर बेल्टमधील लष्करी चौकीला हिमस्खलनाचा तडाखा बसला. तथापि, सर्व जवानांना वाचविण्यात आले.
>महामार्ग बंद
काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे सलग तिसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीमुळे महामार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. जम्मू किंवा श्रीनगर येथून एकाही वाहनाला या मार्गावरून जाण्याची मुभा देण्यात आली नाही.