‘’NTA ला अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात फेकून द्या’’, मनोज झा यांचं संतप्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 08:14 PM2024-08-02T20:14:06+5:302024-08-02T20:17:32+5:30
Manoj Jha Criticize Central Government: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळामुळे NTA वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, आज संसदेमध्ये राजदचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी नीट परीक्षेतील पेपर लीकवरून सरकारवर जोरदार टीका केली.
सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळामुळे NTA वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, आज संसदेमध्ये राजदचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी नीट परीक्षेतील पेपर लीकवरून सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, एनटीएला अरबी समुद्र किंवा, बंगालच्या उपसागरामध्ये फेकून द्या, निवड तुमची आहे. दरम्यान, मनोज झा यांनी सीयूईटीचा उल्लेख कोचिंगचे भीष्म पितामह असा केला.
मनोज झा म्हणाले की, पूर्वी एज्युकेशन स्टेट लिस्टमध्ये व्हायची. ४२ व्या दुरुस्तीनंतर खूप काही घडलं. मात्र राज्यांच्या हातून शिक्षणक्षेत्र पूर्णपणे निसटून गेलं. मागच्या काही वर्षांमध्ये आमच्या देशामध्ये सगळं काही एकच असावं अशी धारणा निर्माण झाली आहे. मात्र विविधतेत एकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. इथे अन्न, वस्त्र, भाषा, क्षेत्र, धर्म सर्वामध्ये विविधता आहे.
मनोज झा म्हणाले की, या विविधतेदरम्यान, आमच्या भूमिकेमधून विविधतेचा सन्मान व्हायला हवा होता. एनटीएसारखी संस्था त्या संकल्पनेसोबत योग्य न्याय करत नाही. आमच्याकडे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही अडचणी होत्या. विविध बोर्डांच्या गुणांमुळे काही अडचणी यायच्या. त्याच्या बदत्याल आपण सीयूईटीची व्यवस्था केली. राज्यशास्त्र विषयामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कुणी विद्यार्थी कोचिंग इन्स्टिट्युटमध्ये जाईल, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. सीयूईटी कोचिंगमधील भीष्म पितामह आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.