धावत्या बसमध्ये छेडछाड करून मायलेकीला फेकले
By admin | Published: May 1, 2015 02:41 AM2015-05-01T02:41:45+5:302015-05-01T02:41:45+5:30
पंजाबमध्ये बुधवारी सायंकाळी मायलेकीला धावत्या बसमध्ये छेडछाड करून नंतर खाली ढकलून देण्यात आल्याची संतप्त घटना घडली.
पंजाबमधील अमानवीय घटना : मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी
मोगा(पंजाब)/नवी दिल्ली: दिल्लीतील निर्भया हत्याकांडाच्या कटुस्मृती अजूनही कायम असताना पंजाबमध्ये बुधवारी सायंकाळी मायलेकीला धावत्या बसमध्ये छेडछाड करून नंतर खाली ढकलून देण्यात आल्याची संतप्त घटना घडली.
यात पीडित तरुणीला आपला जीव गमवावा लागला तर तिची आई जबर जखमी झाली. मोगापासून १० किमी अंतरावर गिल गावाजवळ झालेल्या या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेसह संपूर्ण देशात उमटले. सदर बस पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीची असून विरोधकांनी बादल कुटुंबीयांवर हल्लाबोल केला असून काँग्रेसने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
याप्रकरणी बसचा कंडक्टर सुखरिंदर आणि क्लीनर गुरदीपला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. बस चालकाविरुद्ध मात्र तक्रार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून कंडक्टर व क्लीनरविरुद्ध भादंविच्या ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला) आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मोगाचे पोलीस अधीक्षक (हेरगिरी) एच. एस. पन्नू यांनी गुरुवारी या घटनेची माहिती दिली. बसमधून प्रवास करीत असताना कंडक्टर, क्लीनर आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीने आपल्या १६ वर्षीय मुलीची छेड काढून त्रास देणे सुरू केले आणि नंतर धक्का देऊन खाली फेकले, अशी तक्रार मृत तरुणीच्या आईने केली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी छेडछाड करणाऱ्यांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता दोघींनी बसमधून स्वत:हून उडी घेतल्याचा दावा केला होता. (वृत्तसंस्था)
काय घडले
३८ वर्षीय महिला आणि तिची मुलगी बुधवारी सायंकाळी बसने मोगा येथून बागापुरानाला जात होत्या. यावेळी बस जवळपास रिकामी होती. प्रथम बसच्या क्लीनरने महिलेसोबत छेडछाड सुरू केली. तिने विरोध केल्यानंतरही ते थांबले नाहीत. दरम्यान, आणखी काही आरोपी बसमध्ये चढले आणि सर्वांनी मिळून महिला व तिच्या मुलीला त्रास देणे सुरू केले. महिलेचा १० वर्षांचा मुलगाही त्यांच्यासमवेत होता. विरोधानंतर दोघींनाही धावत्या बसमधून खाली ढकलण्यात आले.
ही घटना म्हणजे मानवतेला कलंक आहे. मी याची तीव्र शब्दात निंदा करतो.
- प्रकाशसिंग बादल
मुख्यमंत्री, पंजाब
‘संपूर्ण पंजाबमध्ये बादल कुटुंबाच्या इशाऱ्याने दहशत पसरविली जात आहे. गुन्हा केल्यानंतर बसच्या चालकदलाचे कर्मचारी बसखाली कुणी चिरडले आहे बघून घ्या, असे पोलिसांना सांगतात. बस थांबविण्याचीही गरज त्यांना वाटत नाही, एवढे ते निर्ढावले आहेत.’
- भगवंत मान
आपचे खासदार, पंजाब