तापमानवाढीमुळे तळमळतोय सागराचा ‘प्राण’ !
By admin | Published: September 13, 2014 02:16 AM2014-09-13T02:16:04+5:302014-09-13T02:16:04+5:30
समुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे
भारत शिंदे, पणजी
समुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सखल भागामध्ये समुद्राचा विस्तार होण्याचा धोका ओळखून मानवाने वेळीच सतर्क होण्याची आवश्यकता असल्याचे असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नकवी यांनी व्यक्त केले. उल्लेखनिय म्हणजे, याच विषयावर न्यूयॉर्क येथील शिखर बैठकीत चिंतनही केले जाईल.
‘हवामान बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम’ या संदर्भात नकवी यांनी ‘लोकमत’शी खास बातचित केली. ते म्हणाले, की समुद्राच्या पाण्यामध्ये विविध स्तर असतात. त्याचे तापमानही वेगवेगळे असते. सर्वात तळातील जलस्तराचे तापमान अत्यंत कमी म्हणजे सुमारे ३ ते ४ सेंटीग्रेड असते. त्याची घनताही जास्त असते. समुद्राच्या बहुतांश पाण्याची घनता सरासरी १.०३ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर असते. त्याचबरोबर समुद्रातील ७५ टक्के पाण्याचे
तापमान ० ते ६ डिग्री सेंटीग्रेड असते. खोल समुद्रातील पाण्याचा स्तर आणि ध्रुवीय प्रदेशातील पाणी थंड असते. त्याच्यावर वातावरणातील तापमान बदलाचाही परिणाम होतो.
वाढत्या तापमानाचा माशांच्या खाद्यावर, गरम पाण्यामध्ये शेवाळावर तसेच माशांच्या शारीरिक संरचनेवर व प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर विचार केल्यास न्युझीलंडमध्ये समुद्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. हे जर असेच होत राहिले तर न्युझीलंड जगाच्या नकाशावर राहील काय, हा प्रश्न आहे. तेथे जमिनीच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे. त्या तुलनेत नेदरलँडमध्ये समुद्राचे तापमान स्थिर आहे, असेही नकवी यांनी सांगितले.
गोव्यामध्ये करंझाळेसारख्या सखल भागात समुद्राच्या वाढत्या पाण्याचा विस्तार होत आहे. गेल्या महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यावरील उंच उंच लाटांनी काही परिसर जलमय झाला होता. बांगलादेशास पुराचा तडाखा
बसला तर तेथील लोक जीव वाचविण्यासाठी शेजारील भागात म्हणजे भारताच्या सीमावर्ती राज्यात स्थलांतर करतात. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत, याचाही उल्लेख नकवी यांनी केला. सध्या समुद्राचा विस्तार रोखण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान विकसित झालेले नाही.