गुरुवार ठरला अपघात वार! कर्नाटकात टँकरवर एसयुव्ही आदळून १२ ठार, महाराष्ट्रातही मोठ्या दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 11:16 AM2023-10-26T11:16:12+5:302023-10-26T11:16:34+5:30
बुधवारी रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. चार अपघातांत मृतांचा आकडा एकूण २४ वर.
बीड आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत १२ जणांचा मृत्यू झालेला असताना कर्नाटकातही एका भीषण अपघाताचे वृत्त येत आहे. एसयुव्ही एका मोठ्या टँकरवर आदळून चिक्कबळ्ळापूरमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.
बुधवारी रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. कडा- धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला ग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात मुंबई वरून बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्स ताबा सुटल्याने सकाळी सहाच्या दरम्यान पलटली. यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्याच्या पाटस हद्दीतील घाट परिसरात टायर फुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या सिमेंटच्या ट्रकला लक्झरी बस आदळून अपघात झाला आहे. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये दोन मृत्यू तर पंधरा जखमी झाले आहेत.
तर एका थांबलेल्या टँकरला एसयूव्हीने धडक दिल्याने १२ जण ठार झाले आहेत. एसयूव्ही बागेपल्ली ते चिक्कबल्लापूरला जात होती. यात चार महिलांसह १२ प्रवासी जागीच ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.