CoronaVirus News : "कोरोना चाचण्यांमध्ये हेराफेरी, रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप"

By सायली शिर्के | Published: October 29, 2020 11:41 AM2020-10-29T11:41:49+5:302020-10-29T11:59:26+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

thyrocare md alleges controlling of corona testing by districts as government interferes | CoronaVirus News : "कोरोना चाचण्यांमध्ये हेराफेरी, रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप"

CoronaVirus News : "कोरोना चाचण्यांमध्ये हेराफेरी, रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप"

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 80,40,203 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,881 नवे रुग्ण आढळले असून 517 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,20,527 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए. वेलुमणी यांनी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतीमा चांगली ठेवण्यासाठी कोरोनाची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलुमणी यांनी केला आहे. "सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होत आहे" असं म्हटलं आहे. 

थायरोकेअरच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला गंभीर आरोप

"आम्हाला विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमुने न घेण्यास सांगितलं जात आहे आणि आम्ही खोटा पॉझिटिव्ह रिपोर्ट सादर करत असल्याचा दावा केला जात आहे" अशी माहिती ए. वेलुमणी यांनी दिली आहे. थायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील कोरोनाग्रस्तांचे नमुने एकत्र करण्याचं काम थायरोकेअरद्वारे करण्यात येत आहे. 

"कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील उद्देश"

"दररोज कमीतकमी 100 जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमुने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतीमा चांगली ठेवू इच्छित आहेत. थायरोकेअरनं ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी 30 टक्के चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे" अशी माहिती वेलुमणी यांनी दिली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांच नाव घेतलं नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

मेट्रोपोलीस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी कोरोना महामारीमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. "जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकीच कोरोनाग्रस्तांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही मिळेल. याद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो" असंही शाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: thyrocare md alleges controlling of corona testing by districts as government interferes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.