तिबेटी, ज्यू, चकमा, सिंधींपासून रोहिंग्यांपर्यंत भारताने दिला अनेक स्थलांतरित समुदायांना आश्रय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 01:42 PM2017-09-15T13:42:04+5:302017-09-15T14:04:37+5:30

गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात भारताने विविध जाती धर्माच्या, वंशाच्या लोकांना आश्रय दिला आहे. कधीकाळी सत्ता गाजवायला आलेल्या परकीयांनाही भारतीय संस्कृतीने सामावून घेतले आहे. रोहिंग्यांना भारतात राहू द्यावे की नाही याबाबत चर्चा सुरु असताना भारताच्या आजवरच्या आदरातिथ्यावर प्रकाश टाकता येईल.

Tibetan, Jewish, Chakma, refugees from many migratory communities given by Sindhi to Rohingya | तिबेटी, ज्यू, चकमा, सिंधींपासून रोहिंग्यांपर्यंत भारताने दिला अनेक स्थलांतरित समुदायांना आश्रय

तिबेटी, ज्यू, चकमा, सिंधींपासून रोहिंग्यांपर्यंत भारताने दिला अनेक स्थलांतरित समुदायांना आश्रय

googlenewsNext
ठळक मुद्देभारताने विविध धर्माच्या, वंशाच्या, देशांच्या लोकांना राहण्यास संधी दिली आहे.एकेकाळी राज्य करण्यासाठी आलेले परकीयही याच मातीशी एकरुप होऊन गेले. अतिथीदेवो भव या भारतीय संस्कृतीचा लाभ तिबेटी बौद्धांपासून श्रीलंकन तमिळ लोकांपर्यंत अनेक समुदायंनी घेतला आहे.

मुंबई, दि. 15- अतिथी देवो भव किंवा घरी आलेल्या पाहुण्याची सर्व प्रकारे काळजी घ्या ही केवळ प्राचीन भारतीय ग्रंथांमधील शिकवण नाही तर भारतीयांनी ती वृत्ती अंगी बाणवलेली आहे. गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात भारताने विविध जाती धर्माच्या, वंशाच्या लोकांना आश्रय दिला आहे. कधीकाळी सत्ता गाजवायला आलेल्या परकीयांनाही भारतीय संस्कृतीने सामावून घेतले आहे. रोहिंग्यांना भारतात राहू द्यावे की नाही याबाबत चर्चा सुरु असताना भारताच्या आजवरच्या आदरातिथ्यावर प्रकाश टाकता येईल.

स्वातंत्र्यापुर्वीचे स्थलांतरित
सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकणात नौगांव आणि केरळमध्ये ज्यूंच्या बोटी लागल्या. संपुर्ण जगात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या या ज्यूंना भारताने आपलेसे केले, त्यांना व्यवसाय करण्याचा, मालमत्ता कमावण्याची संधी मिळवून दिली. ज्यूंचा छळ झाला नाही असा भारत हा एकमेव देश आहे. केरळमध्ये सीरियन, कोकणात व महाराष्ट्रात बेने इस्रायली, कलकत्त्यात बगदादी आणि ईशान्य भारतात बेने मनाशे या ज्यूंनी आश्रय घेतला. त्यातील बहुतांश ज्यू इस्रायलची निर्मिती झाल्यावर तिकडे निघून गेले तर काही आजही येथे राहात आहेत. चित्रपट, उद्योग, लष्कर अशा सर्व विविध क्षेत्रांमध्ये ज्यू बांधवांनी योगदान दिले. त्यानंतर महत्त्वाचा समुदाय भारतात आला तो पारशी धर्मियांचा. इराणमधील हिंसेला कंटाळून हे पारशी बांधव गुजरातच्या संजाणला आले. येथे त्यांना व्यवसायाची संधी देण्यात आली. गुजरात, मुंबई आणि पुण्यासारख्या विविध भागांमध्ये ते स्थायिक झाले. देशाच्या महत्त्वाचे उद्योग आणि व्यवसाय, बॅंका निर्माण करण्यासाठी पारशी लोकांचा हातभार लागलेला आहे. भारतात एकेकाळी सत्ता गाजवणारे मुघलही येथेच मिसळून गेले. त्यानंतर व्यापार आणि लष्करात तसेच गुलामीसाठी आलेले सिद्दीही भारतीय संस्कृतीचा भाग बनून गेले. अॅबिसिनियातून आलेले हे लोक मुघल, निजामाच्या लष्करामध्ये सेवा देत होतेच त्याहून जंजिरा, सचिन, जाफ्राबाद संस्थानचे ते राजेही झाले. आज देशातील काही प्रांतात सिद्दींना अनुसुचित जमातींचा दर्जा मिळालेला आहे. या प्रकारे स्वातंत्र्यापुर्वी भारत हा विविध समुदायांसाठी यजमान देश झाला होता. 

पाकिस्तानातून आलेले स्थलांतरीत
20 व्या शतकाच्या पुर्वार्ध आणि मध्यंतरात भारतात आश्रितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. पाकिस्तान नावाचा देश भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूस निर्माण झाला तेव्हा दोन्ही दिशांनी भारतात लोक येऊ लागले. 1947 च्या फाळणीच्या वेळेस 72 लाख लोक भारतात आले अशी आकडेवारी सांगते. भारतीय उपखंडात त्यानंतर पाकिस्तानची 1971 साली पुन्हा फाळणी झाली. 1971च्या आसपास पश्चिम पाकिस्तानने लष्कराच्या बळावर  पूर्व पाकिस्तानमध्ये दडपशाही सुरु केल्यावर  स्थलांतरितांचे मोठे लोंढे भारतात आले. पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या सिंधी समुदायाला देशातील विविध प्रांतामध्ये स्थायिक होण्याची, व्यवसाय करण्याची संधी देण्यात आली. आज सिंधी भाषा, संस्कृती व उद्योग अत्यंत जोमाने जोपासले जात असून सिंधी समाज एक प्रमुख व्यापारी समुदाय म्हणून ओळखला जातो. कापड व्यवसायामध्ये या समुदायाने नाव कमावले आहे.

बांगलादेशातून आलेले स्थलांतरित
बांगलादेशच्या पूर्व भागात असणाऱ्या आणि म्यानामारला लागून असणाऱ्या चितगांव हिल टेरिटरी मध्ये चकमा हे बौद्ध आणि हाजोंग हे हिंदू लोक राहात होते. या लोकांना फाळणीमध्ये आपला प्रदेश भारतात येईल असे वाटत होते. मात्र रॅडक्लिफ यांनी कोलकाता बंदर भारताला आणि चितगांव बंदर पाकिस्तानला (पूर्व) देण्याचे निश्चित केल्यावर हा सगळा प्रांत पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशात गेला. तसेच येथे सिल्हेट या मुस्लीमबहुल जिल्ह्यातून मुस्लीम लोक येऊन राहू लागले. साहजिकच बौद्ध आणि हिंदूंचे प्रमाण कमी होऊ लागले. कर्णफुली येथील कागदप्रकल्प आणि कपताई जलविद्युत प्रकल्पामुळे या लोकांच्या जमिनी गेल्या तसेच त्यांचे उपजिविकेचे साधनही हिरावून घेण्यात आले. त्यामुळे 1961 साली 60 हजार चकमा व हाजोंग भारतात आले. सध्याचे मिझोरम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश येथे त्यांना वसवण्यात आले. तरिही मिझो जमातीचे लोक आणि अरुणाचलचे मूलनिवासी यांना हे बाहेरुन आलेले लोक आमच्या प्रदेशात प्रबळ होतील अशी भिती वाटत राहिली. तसेच यामुळे चकमाही स्वतःला असुरक्षित समजू लागले. त्यांनी स्वतंत्र चकमलॅंड राज्याची मागणीही केली होती. आता याच आठवड्यात भारत सरकारने चकमा आणि हाजोंग समुदायांच्या 1 लाख लोकांना नागरिकत्त्व देण्याचे जाहीर केले आहे.

तिबेटमधून आलेले स्थलांतरित
चीनच्या साम्राज्यवादी धोरणाचा वरवंटा तिबेटवर फिरल्यावर तेथिल 14 वे दलाई लामा 80 हजार अनुयायांसह 1959 साली भारतात आले. गेल्या सत्तर वर्षांमध्ये दीड लाख तिबेटी भारतात येऊन स्थायिक झाले. त्यांना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला, कर्नाटकात म्हैसूर, कोडुगू, हसन, उत्तर कन्नड जिल्ह्यात छावण्या तयार करण्याची संधी देण्यात आली.

तिबेटी निर्वासित महिलांनी बांधली सरसंघचालकांना राखी

अफगाणिस्तान, श्रीलंकेतून आलेले स्थलांतरित
1979-89 या दशकात सुरु असलेल्या सोव्हिएट रशिया आणि अफगाणिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुऎळे 60 हजार अफगाणी लोक भारतात आले तर श्रीलंकेत तामिळी वाघ आणि तेथिल सरकार यांच्यामध्ये झालेल्या दीर्घ यादवीला कंटाळून, जीव वाचवण्यासाठी 1 लाख लोक भारतात आले. हे लोक तामिळनाडूत चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोइमतूर, कर्नाटकात बंगळुरु आणि केरळमध्ये स्थायिक झाले.

म्यानमारमधून आलेले स्थलांतरित

 म्यानमारमधून भारतात रोहिंग्या तसेच हिंदूही येऊन राहिलेले आहेत. ब्रिटिशांच्या सेवेत असणारे नोकरदार, व्यापारी स्वातंत्र्यानंतर भारतात येऊन स्थायिक झाले. सध्या भारतात बेकायदेशीर रित्या 40 हजार रोहिंग्या राहात असून त्यांना परत पाठवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. हे रोहिंग्या भारता सर्वात जास्त जम्मू आणि काश्मीर राज्यात राहात असून आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यातही ते राहात आहेत.

रोहिंग्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

देशांतर्गत स्थलांतर करणारे काश्मीर पंडित
काश्मीरी पंडित हा भारतातील सर्वात जास्त त्रास सहन करावी लागलेला समुदाय म्हणावा लागेल. आपल्याच देशात आश्रितांचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. काश्मीर खोऱ्यातील दहशतीला आणि हिंसेला कंटाळून या लोकांना देशात विविध ठिकाणी आश्रय शोधावा लागला आणि काही ठिकाणी रेफ्युजी कॅम्प्स मध्ये राहावे लागले.

भारतातील पोलिश आश्रितांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
भारतामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942 साली पोलिश स्थलांतरित आश्रयास आले होते. गुजरातमधील नवानगरचे राजे महाराजा दिग्विजयसिंहदी रणजितसिंहजी जडेजा यांनी 640 पोलिश मुलांना आसरा दिला तर कोल्हापूरजवळील वळीवडे कॅम्प येथे अनेक पोलिश बांधव स्थायिक झाले. फाळणीनंतर या कॅम्पजवळ सिंधी लोक राहू लागले.

Web Title: Tibetan, Jewish, Chakma, refugees from many migratory communities given by Sindhi to Rohingya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत