तिकीट कापले, आता वरुण गांधी काय करणार? उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 06:36 AM2024-03-27T06:36:19+5:302024-03-27T06:36:55+5:30
वरूण गांधी आता समाजवादी पार्टी, काँग्रेसकडून किंवा अपक्ष म्हणूनसुद्धा निवडणूक लढू शकतात अशा चर्चा आहेत.
- ललित झांबरे
पिलिभीत : सध्या भाजपने तिकीट नाकारल्यामुळे वरुण गांधी यांचे नाव चर्चेत आहे. पिलिभीत मतदारसंघातून भाजपने त्यांच्या जागी यावेळी जितीन प्रसाद यांना संधी दिली आहे. यानंतर वरुण गांधी नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता साऱ्या देशाचे लक्ष आहे.
पिलिभीत मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहेतिथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारपर्यंतच (दि. २७) मुदत आहे. त्यासाठी आता अखेरच्या दिवशी वरुण गांधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरूण गांधी आता समाजवादी पार्टी, काँग्रेसकडून किंवा अपक्ष म्हणूनसुद्धा निवडणूक लढू शकतात अशा चर्चा आहेत. मात्र, स्वत: वरुण गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
काॅंग्रेसमध्ये जाणार की समाजवादी पक्षात?
वरुण गांधी हे जर काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना अमेठी किंवा रायबरेली येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते.
देशाचे लक्ष लागून असलेल्या या दोन्ही जागांवर काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. ते सपाकडे वळण्याच्या चर्चा असल्या तरी अखिलेश यादव यांनी याबाबत स्पष्ट बोलणे टाळले आहे.
...यामुळे ओढावली नाराजी
वरुण गांधी यांनी बऱ्याचदा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली होती. गेल्या वर्षी अमेठीतील संजय गांधी दवाखान्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या दवाखान्याचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यावेळीही वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती.
लखमीपूर खेरी येथील हिंसाचाराबद्दल केलेल्या विधानानंतर मनेका गांधी व वरुण गांधी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले होते.