तिकीट इच्छुकांची भाजपा मुख्यालयात गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:32 AM2019-03-15T06:32:59+5:302019-03-15T06:33:14+5:30
नवी दिल्ली : भाजपा लोकसभा निवडणुकीत जिंकणारच याची खात्री असलेल्या तिकीट इच्छुकांची गर्दी पक्षाच्या येथील दीन दयाळ उपाध्याय मार्गावरील ...
नवी दिल्ली : भाजपा लोकसभा निवडणुकीत जिंकणारच याची खात्री असलेल्या तिकीट इच्छुकांची गर्दी पक्षाच्या येथील दीन दयाळ उपाध्याय मार्गावरील राष्ट्रीय कार्यालयात वाढत आहे. याचबरोबर भाजपाकडून वेगवेगळ््या नेत्यांना वेगवेगळ््या ठिकाणांहून उमेदवारी देण्याच्याही बातम्या आहेत. मात्र या तिकीट वाटपावर भाजपाने मौन बाळगले आहे.
पक्षाच्या महासचिवाने चर्चेतील नावे व त्यांचे मतदारसंघ याबद्दल म्हटले की, त्याबद्दल काहीही अधिकृत नाही. केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल तेव्हाच नावे आणि मतदारसंघ निश्चित होतील. या समितीची पहिली बैठक १६ मार्च रोजी होईल व तीत किमान १०० नावे निश्चित होतील.
भाजपातील इच्छुकांना १५ ते १८ मार्च दरम्यान बहुतेक तिकिटांचा निर्णय होईल अशी आशा आहे. इच्छूक, अर्ज करणारे व तिकीट मिळावेच असे वाटणारे होळीच्या प्रतिक्षेत आहेत. होळीनंतरच तिकिटांची घोषणा होईल, असे एका गटाचे म्हणणे आहे. जर त्या आधी नावे जाहीर झाली तर ज्यांची संधी जाईल ते होळीनिमित्तचे त्यांनीच आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करू शकतात. होळीत कार्यकर्ते-मतदार ज्यामुळे प्रचार होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. भाजपातील तिकीट इच्छूकांसाठी बुधवारचा दिवस आनंदाचा होता. त्यांना तिकीट मिळेल की नाही हे तर नंतर ठरेल पण पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ५०० पेक्षा जास्त तिकीट इच्छुकांची भाजपाच्या मुख्यालयात मुलाखत घेतली. त्यापैकी एका इच्छुकाने ‘लोकमत’ला सांगितले की, अमित शहा यांनी माझी व्यक्तीगत मुलाखत घेतली ही फारच आनंदाची बाब आहे. मला तिकीट नाही मिळाले तरी मी पक्षासाठी काम करीन.