भाजपाच्या ४००० ठिकाणी टिफिन बैठका, अमित शाह बिहारमधून करणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:33 AM2023-06-03T07:33:25+5:302023-06-03T07:34:09+5:30
पाच लाख प्रतिष्ठित व्यक्तींना भेटणार
संजय शर्मा
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघात ४००० ठिकाणी टिफिन बैठका आयोजित करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी बिहारमधील आरा येथून या टिफिन बैठकीला सुरुवात करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी या बैठका आयोजित करण्यात येत आहेत. ३० मे ते ३० जून या कालावधीत चालणाऱ्या भाजपच्या जनसंपर्क अभियानादरम्यान भाजप देशातील ५ लाख प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क करणार आहे.
देशातील प्रत्येक लोकसभा जागेवर अशा एक हजार प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी ४० नेते आणि कार्यकर्त्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या कामात भाजपच्या २५० ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. चंदीगडच्या नेत्याला पुण्यात, बिहारच्या गयाच्या नेत्याला राजस्थानच्या कोटामध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. यादरम्यान भाजपचा युवा मोर्चा देशातील ९५४ जिल्ह्यांमध्ये १८०० बाईक रॅली काढणार आहे.