२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत विशाल वन्यजीव सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 05:47 AM2023-04-11T05:47:21+5:302023-04-11T05:47:50+5:30
२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत व्यापक, विशाल वन्यजीव सर्वेक्षण आहे.
नवी दिल्ली :
२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत व्यापक, विशाल वन्यजीव सर्वेक्षण आहे. यात २० राज्यांसह ६ लाख ४१ हजार ४४९ किलोमीटरच्या प्रभावशाली पायी सर्वेक्षणाचा समावेश आहे, अशी माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
या अखिल भारतीय स्तरावरील व्याघ्रगणनेच्या अभ्यास पथकात एनटीसीए तसेच राज्यांमधील अधिकारी आणि तज्ज्ञ, संशोधन जीवशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, समन्वयक, प्रशिक्षणार्थी व स्वयंसेवक यांचा समावेश होता. सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून या पथकाने वनस्पती, मानवी प्रभाव आणि अशुद्ध मल यावरील माहिती प्राप्त करण्यासाठी ३,२४,००३ अधिवास भूखंडांचे नमुने घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हैसूर येथे एका कार्यक्रमात जारी केलेल्या ‘स्टेटस ऑफ टायगर्स २०२२’ अहवालानुसार ३२,५८८ ठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे वाघांच्या ९७,३९९ प्रतिमांसह एकूण ४,७०,८१,८८१ प्रतिमा मिळाल्या. “या अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांची गरज होती आणि तो पूर्ण करण्यासाठी पथकाने ६ लाख ४१ हजार १०२ मनुष्य दिवस खर्ची घातले. आम्ही मानतो की, आजपर्यंत करण्यात आलेला वन्यजीव सर्वेक्षणाचा जगातील हा सर्वांत मोठा प्रयत्न आहे, असे अहवालात म्हटले आहे.
वाघांच्या संख्येत उत्साहजनक वाढ
वाघांची (एक वर्षाहून मोठ्या) एकूण ३,०८० छायाचित्रे कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली आहेत. २०१८ च्या (२,६९७) आकड्यांच्या तुलनेत ही संख्या वाघांच्या संख्येतील वाढ दर्शवते. “सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार भारतातील वाघांची किमान लोकसंख्या अंदाजे ३,१६७ आहे, जी वाघांच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ दर्शवते,” असे पर्यावरण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.