चित्त्यांना भारतात घेऊन येणार वाघाचे विमान; १९४८ साली झालं होतं अखेरचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:27 AM2022-09-16T07:27:41+5:302022-09-16T07:27:51+5:30
शनिवारी, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शनिवारी सोडणार कुनो राष्ट्रीय उद्यानात
विंडहोक : नामिबियातून आठ चित्त्यांना भारतात घेऊन येणाऱ्या विमानावर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघाचे चित्र रंगविण्यात आले आहे. त्या विमानाचे समाजमाध्यमांवर झळकलेले छायाचित्र सर्वांच्या औत्सुक्याचा विषय बनले आहे.
भारतातून १९५०च्या दशकात चित्ते नामशेष झाले. त्यांचा देशात पुन्हा अधिवास तयार व्हावा, यासाठी नामिबियातून चित्ते आणून ते शनिवारी, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहेत.
चित्त्यांना घेऊन येणारे बी ७४७ प्रकारचे जेट विमान नामिबियात दाखल झाले आहे. या विमानातूून पाच नर व तीन मादी चित्ते जयपूर येथे विमानाने आणले जातील. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरद्वारे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नेले जाणार आहे. (वृत्तसंस्था)
असा नामशेष झाला भारतातून चित्ता...
चित्ता भारतातून नामशेष झाल्याची घोषणा सरकारने १९५२ साली केली. देशात शेवटचा चित्ता छत्तीसगड येथील साल जंगलामध्ये १९४८ साली मरण पावला. चित्त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी १९७०च्या दशकापासून केंद्र सरकारने सुरू केले. त्यासाठी नामिबियाबरोबर भारताने करार केला होता. त्यानुसार नामिबियाने आता भारताला आठ चित्ते देऊ केले आहेत.
संपूर्ण प्रवास होणार उपाशीपोटी : नामिबिया ते भारत हा संपूर्ण प्रवास चित्त्यांना उपाशीपोटी करावा लागणार आहे. कारण इतक्या लांबच्या प्रवासात प्राण्यांनाही मळमळल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे त्यांना या प्रवासात काहीही खायला देण्यात येणार नाही.
सकाळी ७ वाजता नामीबियाहून कार्गो विमान जयपूरला पोहोचणार
सकाळी ९ वाजता जयपूरहून हेलिकॉप्टरने श्योपूर येथे पाठवण्यात येणार