Tiger Video: वाघाने केली उंटाची शिकार, पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केला शिकारीचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:13 PM2022-02-11T17:13:19+5:302022-02-11T17:14:59+5:30
सवाई माधोपूरमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात T-99 वाघिणीने उंटाचा फडशा पाडला. ही संपूर्ण घटना पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.
सवाई माधोपूर: तुम्ही अनेकदा वाघांच्या (Tiger) शिकारीचे व्हिडिओ पाहिले असतील. पण, सवाई माधोपूर (Sawai madhopur) मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात (Ranthambor National Park) पर्यटकांना एका थरारक दृष्याचा अनुभव आला. रणथंबोर उद्यानात एका वाघिणीने चक्क उंटाची शिकार केली. शिकार केल्यानंतर वाघिणीने उंटाला जबड्यात पकडून झुडपात नेले आणि आपल्या पिलांसोबत शिकार फस्त केली. दरम्यान, हा संपूर्ण थरार पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही शिकारीचीघटना गुरुवारी घडली. ही T-99 वाघीण रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या झोन-10 जवळ फिरत होती. इकडे तिकडे फिरत असताना तिला एक उंट दिसला. वाघिणीने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि आपल्या दात आणि नखांनी उंटाचा फडशा पाडला. यादरम्यान उंटाने पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण वाघिणीसमोर त्याचा निभाव लागला नाही. शिकारीनंतर वाघिणीने उंटाला झुडपांच्या मागे नेले आणि आपल्या शावकांसोबत शिकार फस्त केली.
डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच पिल्लासोबत पाहिले होते
वाघिणी T-99 शावकासह प्रथम 26 डिसेंबर रोजी दिसली होती. त्यावेळी वनविभागाच्या कॅमेऱ्यात एकच शावक दिसला होता. पण, आता ती 3 शावकांची आई असल्याचे समोर आले. ही टायग्रेस टी-99 टी-60 ची मुलगी आहे. विशेष म्हणजे रणथंबोरमध्ये 80 पेक्षा जास्त वाघ आणि वाघिणी आहेत. सध्या या राष्ट्रीय उद्यानात वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी येत आहे.