तुरुंगातील एकता; तिहारमधील 150 हिंदू कैद्यांचा मुस्लिमांसोबत रोजा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:11 PM2019-05-14T12:11:14+5:302019-05-14T12:13:51+5:30
यंदा रोजा ठेवणाऱ्या हिंदूंच्या संख्येत तिप्पट वाढ
नवी दिल्ली: तिहारच्या तुरुंगातील 150 हिंदू कैद्यांनी यंदा रोजा ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रोजा पाळणाऱ्या हिंदू कैद्यांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षी 59 हिंदू कैद्यांनी रोजा ठेवला होता. तुरुंगातील मुस्लिम कैद्यांसोबतचा बंधूभाव वाढावा, एकता कायम राहावी, यासाठी बरेचसे हिंदू कैदी रोजा ठेवत असल्याची माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली.
'तिहार तुरुंगात एकूण 16 हजार 665 कैदी आहेत. यातल्या 2 हजार 658 कैद्यांनी रोजा पाळला आहे. यात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांच्या कैद्यांचा समावेश आहे. आम्ही त्यांच्यासाठी विशेष आयोजन केलं आहे. यंदा रोजा ठेवणाऱ्या मुस्लिमांचं प्रमाण वाढलं आहे. ही वाढ जवळपास तिप्पट आहे,' अशी माहिती तुरुंग प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिली. 'मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिहारमधल्या विविध तुरुंगात असलेल्या हिंदू कैद्यांनी त्यांच्या अधीक्षकांची भेट घेतली. त्यांना रोजा ठेवायचा असल्याची माहिती त्यांनी अधीक्षकांना दिली. यानंतर अधीक्षकांनी रोजा ठेवणाऱ्या एकूण कैद्यांची मोजणी केली. यानंतर त्यांच्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलं,' असं प्रवक्त्यांनी सांगितलं.
हिंदू कैद्यांनी रोजा ठेवण्यामागे विविध कारणं असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांनी म्हटलं. 'मुस्लिम कैद्यांसोबतचा बंधूभाव वाढावा, यासाठी रोजा ठेवत असल्याचं काही कैद्यांनी सांगितलं. तुरुंगात आल्यावर धर्म बदलल्याची कबुली द्यायची नसल्यास काही जण हे कारण देतात. तुरुंगात आल्यावर 80 ते 90 टक्के जण धार्मिक होतात, असं आम्हाला आढळून आलं आहे. धार्मिक कार्यातून शांतता मिळते यासाठीही काही जण रोजा ठेवतात. तर देवाची प्रार्थना केल्यास तुरुंगातून लवकर सुटका होईल, अशी अनेकांची समजूत असते,' असं तुरुंग प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.
नवरात्रौत्सव काळात तुरुंगातले अनेक मुस्लिम कैदी उपवास करतात, अशी माहिती दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली. तुरुंगातले अनेक मुस्लिम कैदी हिंदू कैद्यांसोबत उपवास करतात. तिहारच नव्हे, तर देशातल्या अनेक तुरुंगांमध्ये अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं, असं त्यांनी सांगितलं. रमजानच्या काळात धर्मगुरुंना तुरुंगात येण्याची परवानगी दिली जाते. कैदी त्यांच्यासोबत प्रार्थना करतात. यानंतर कैद्यांना रुअफजा आणि खजूर दिले जातात.