'नायक नहीं, खलनायक हू मैं...' हातात पिस्तुल घेऊन डान्स, तिहार जेलरचा व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 15:41 IST2024-08-09T15:40:46+5:302024-08-09T15:41:18+5:30
तिहार तुरुंगाचे जेलर दीपक शर्मा यांनी हातात पिस्तुल घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

'नायक नहीं, खलनायक हू मैं...' हातात पिस्तुल घेऊन डान्स, तिहार जेलरचा व्हिडिओ व्हायरल...
Tihar Jail Jailer Deepak Sharma Viral Video: तिहार तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक/जेलर दीपक शर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या ते 'नायक नहीं, खलनायक हू मैं' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. नाचणे चुकीचे नाही, पण यावेळी ते चक्क पिस्तुल हातात घेऊन नाचत होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेलर दीपक शर्मा गुरुवारी(दि.9) रात्री घोंडा येथील भाजप नगरसेविकेच्या पतीच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेले होते. सीमापुरी पोलिस ठाण्याजवळ हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी पार्टीत दीपक शर्मांनी संजय दत्तच्या 'खलनायक' चित्रपटातील 'नायक नहीं, खलनायक हू मैं' गाण्यावर डान्स केला आणि हातात पिस्तूल भिरकावली. आता याबाबत तिहार तुरुंग प्रशासन चौकशी करणार असून, दोषी आढळल्यावर दीपक शर्मांवर कडक कारवाई होऊ शकते.
ते पिस्तूल कोणाचे?
डीसीपी सुरेंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. शस्त्र परवानाधारक होते की नाही, दीपक शर्मा यांचे होते की नाही, याची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे, दीपक शर्मा वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मंडोली कारागृहात कैदी सुकेश चंद्रशेखर याने सहायक अधीक्षक दीपक शर्मा आणि उपअधीक्षक जयसिंग यांच्यावर अनेक आरोप केले होते.
कैद्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप
'दीपक शर्माला चित्रपटात काम करायचे आहे. यासाठी ते माझ्यावर सतत दबाव आणत आहेत. त्यांनी माझ्याकडून बॉडी बिल्डिंगसाठी 30 लाख रुपये घेतले. माझ्याकडून 5 लाख रुपये प्रोटेक्शन मनी म्हणूनदेखील घेतले, असा आरोप सुकेशने केला होता. इतर अनेक कैद्यांनीही दीपक शर्माविरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत. आता त्या सर्व तक्रारींचीदेखील चौकशी होऊ शकते.