यंदा दसऱ्याला रावणासोबतच दहशतवादाचेही होणार दहन
By admin | Published: October 11, 2016 04:52 AM2016-10-11T04:52:25+5:302016-10-11T04:52:49+5:30
विजयादशमीनिमित्त देशाच्या अनेक भागात रावणाच्या प्रतिमांचे दहन करण्याची परंपरा टिकून असली तरी यंदा लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’मुळे
नवी दिल्ली: विजयादशमीनिमित्त देशाच्या अनेक भागात रावणाच्या प्रतिमांचे दहन करण्याची परंपरा टिकून असली तरी यंदा लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’मुळे या कार्यक्रमांना वेगळा संदर्भ मिळत असल्याचे दिसते. एरवी ‘रावण दहन’ हे वाईट प्रवृत्तींचा प्रतिकात्मक नायनाट या दृष्टीने पाहिले जाते. पण लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केल्यानंतर आता आयोजकांनी रावणाला दहशतवादाचे प्रतिक बनवून त्याचे दहन करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी खास प्रकारचे रावणाचे पुतळे तयार करून घेतले आहेत किंवा नेहमीच्या पुतळ््यांवर या आशयाचे संदेश लिहून घेतले आहेत.
दिल्लीत टागोर गार्डनच्या परिसरातील तितरपूरमध्ये रावणाचे पुतळे बनविणाऱ्यांची गेले कित्येक महिने लगबग सुरू आहे. येथे तयार केलेले रावणाचे पुतळे हरियाणा, उत्तर प्रदेश व उत्तराखंडसह दूरवरच्या ठिकाणी पाठविले जातात. या परिसराचा फेरफटका मारून पुतळे तयार करणारे व ते न्यायला आलेल्या लोकांशी बोलल्यावर ‘रावण दहना’चा हा बदललेला ‘मूड’ जाणवतो.
यंदाच्या रावण दहनातून दहशतवादाच्या विरोधात संदेश समाजात देण्याचा आमचा विचार आहे, असे पुतळे न्यायला आलेल्या अनेकांनी सांगितले. पुतळे बनविणाऱ्या महेंद्र नावाच्या कलाकाराने सांगितले की, अनेकांनी त्यांच्या रावणाच्या पुतळ््यावर दहशतवादाचा निषेध करणारी घोषवाक्ये लिहिण्यास सांगितले आहे. पुतळ््यांवर काळा कागद लावून, त्यावर चंदेरी अक्षरात आम्ही त्यांना हवे तसे संदेश चिकटविले आहेत.
सुभाष नावाचा कलाकार म्हणाला की, दरवर्षी रावणाचे पुतळे बनविण्यामागे काही तरी प्रसंगोपात्त विचार असतो. गेल्या वर्षी खलनायक हा मुख्य विषय होता. यंदा दहशतवादविरोधी लाट आलेली दिसते. काही आयोजकांनी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या नेहमीच्या पुतळ््यांसोबत दहशतवादाचे प्रतिक म्हणून आणखी एक स्वतंत्र पुतळाही तयार करून घेतला आहे. पुतळे बनविणाऱ्या किशोर या कलाकाराने सांगितले की, ज्यांना उघडपणे वाद नकोसा वाटतो, त्यांनी पाकिस्तानचा निदर्शक असा हिरव्या रंगाचा कागद पुतळ््यांवर लावायला सांगितले आहे. कोणताही संदेश न लिहिता त्यांनी पूर्णपणे हिरव्या रंगाचे पुतळे तयार करून घेतले आहेत.
आम्ही दहशतवादरूपी संपूर्ण काळ््या रंगाचा एक वेगळा पुतळा तयार करून घेतला आहे. रावण, कुंभकर्ण व मेघनाद यांच्या पुतळ््यांसोबत आम्ही दसऱ्याला त्याचेही दहन करणार असल्याचे नव श्री धार्मिक लीला कमिटीचे प्रेस सेक्रेटरी राहुल शर्मा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)