...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:37 PM2020-06-27T13:37:24+5:302020-06-27T13:41:30+5:30
एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.
नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेली हिंसक झटापट आणि दोन्ही देशांचे लष्कर सध्या समोरासमोर येऊन उभे टाकल्याने प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या जगभरात झालेला कोरोनाचा फैलाव आणि चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देश चीनवर नाराज आहेत. मात्र थोडीफार आक्रमक विधाने वगळता कुठलाही देश चीनविरोधात आक्रमक झालेला दिसत नाही. आपल्या देशातूनही सध्या चीनविरोधात आक्रमक वक्तव्ये होत आहेत. मात्र एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.
त्याचे झाले असे होते की, १९६२ च्या युद्धानंतर चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत होता. त्यासाठी चीनकडून वेगवेगळे आरोपही करण्यात येत होते. त्यातच १९६५ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यादरम्यान, चीनने भारतीय सैनिकांनी आपल्या बकऱ्या आणि याक चोरल्याचा आरोप केला होता. याबाबत चीन सरकारने भारत सरकारला पत्र लिहून भारतीय सैनिकांनी आपल्या ८०० बकऱ्या आणि ५९ याक चोरल्याचा आरोप केला.
एकीकडे भारतीय लष्कर पाकिस्तानसोबत लढाईत गुंतले होते. तर दुसरीकडे चीन सिक्कीममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते, अशा त्या काळात भारत सरकारने हा आरोप फेटाळला. मात्र चीनच्या या आरोपाला वाजपेयींनी आपल्या कृतीच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिले होते. वाजपेयी तेव्हा जनसंघाचे नेते होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनी ८०० बकऱ्यांची व्यवस्था केली आणि दिल्लीतील चिनी दूतावास गाठला. या बकऱ्यांच्या शरीरावर आम्हाला खा पण जगाला वाचवा, असे उपहासात्मक पत्रही लावले होते. दरम्यान, वाजपेयींच्या या कृतीची तेव्हा खूप चर्चा झाली. भारत सरकारनेही यावरून चीनला खरमरीत उत्तर दिले. दिल्लीमध्ये कुणीतरी ८०० बोकडांचा मोर्चा काढला. मात्र भारत सरकारचा याच्याशी संबंध नाही, कुठल्याही मुद्द्यावरून भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनविरोधात भारताच्या नागरिकांनी शांततापूर्ण आणि विनोदी मार्गाने दिलेली प्रतिक्रिया आहे, असे सरकारने चीनला सांगितले.
मात्र या सर्व प्रकारामुळे चीनचा अपमान झाल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. पण त्यात चीनचेच हसे झाले. या घटनेनंतर चीनने सिक्कीममधील नथू ला येथे भारताविरोधात आगळीक केली होती. मात्र त्याला भारतीय लष्कराने सणसणीत उत्तर देऊन चिनी सैनिकांना पिटाळून लावले होते.