अडचणींचा सामना केल्यानंतर आता सेलिब्रेशनची वेळ- दीपिका पादुकोण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:29 AM2018-01-25T10:29:33+5:302018-01-25T10:41:58+5:30
संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा अनेक वादविवादानंतर अखेरीस आज प्रदर्शित झाला आहे.
मुंबई- संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा अनेक वादविवादानंतर अखेरीस आज प्रदर्शित झाला आहे. राज्यात व देशात ठिकठिकाणी सिनेमाला विरोध केला जात असता तरी हा विरोध झुगारून लोक सिनेमा पाहण्यास प्राधान्य देत आहेत. चार मोठ्या राज्यात सिनेमाला एन्ट्री नसली तर इतर ठिकाणी तिकीट विक्री जोरदार सुरू आहे. पद्मावत सिनेमा वादात सापडल्यानंतर सिनेमातील कलाकारांनी सिनेमावर किंवा सिनेमातील वादावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण आता सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सिनेमात राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पादुकोणने प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात दीपिका पोलीस सुरक्षेत पोहचली होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर आणि अडचणीनंतर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आता सेलिब्रेशन करण्याची वेळ आली आहे, अशी भावना दीपिकाने व्यक्त केली. पद्मावत सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून एक बेंचमार्क स्थापन करेल, असं विश्वास दीपिकाने व्यक्त केला आहे.
'मी सध्या खूप भावूक आहे. सिनेमाने खूप अडचणींचा सामना केला आहे. सगळ्या अडचणींना तोंड दिल्यानंतर सिनेमा अखेरीस प्रदर्शित झाला. सिनेमाच मी निभावेलल्या भूमिकेला प्रेक्षक दाद देत आहेत. सिनेमासाठी मी खूप उत्साही असून आता सेलिब्रेशनची वेळ आली आहे, असं दीपिकाने म्हंटलं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आता सिनेमा व आमच्या कामामुळे त्याचं उत्तर मिळेल. आम्ही आमच्या कामातूनच आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. यापेक्षा दुसरा चांगला पर्याय कुठलाही नाही. खरंतर मी माझ्या सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील कलेक्शनबद्दल उत्साही नसते पण पद्मावत सिनेमाच्या बिझनेसबद्दल मी खूप उत्साही आहे. सिनेमा बॉक्सऑफिस कलेक्शनवर धूम करेल, असा विश्वास दीपिकाने व्यक्त केला.
'पद्मावत'ला 4 मोठ्या राज्यांत एन्ट्री नाहीच; मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व दक्षिणेत जोरदार तिकीटविक्री
संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक भागांमध्ये राजपूत संघटना आणि करणी सेनेकडून हिंसक आंदोलनं सुरू आहेत.
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व गोवामध्ये पद्मावतविरोधात हिंसक आंदोलनं होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन आॅफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे