“वेळ सर्वकाही ठीक करते..,” सचिन पायलट यांच्यासोबतच्या संबंधांवर गहलोत यांची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 04:01 PM2022-12-11T16:01:02+5:302022-12-11T16:01:26+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “भारत जोडो यात्रेचा संदेश देशभरात पोहोचला आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला टीका आवडत नाही. टीका केलीत तर तुरुंगात जा. लाखो लोक आमच्या प्रवासात सामील होत आहेत.”
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील बिघडलेल्या संबंधांबद्दल सर्वांनाच कल्पना आहे. दरम्यान, मुख्यमंत्री गहलोत यांनी काही दिवसांपूर्वी पायलट यांचा गद्दार असाही उल्लेख केला होता. परंतु आता त्यांनी आपल्या संबंधांवर पुन्हा भाष्य करत वेळ सर्वकाही ठीक करत असल्याचं म्हटलं. “राजकारणात अशा घटना घडतच असतात. काळाबरोबर सर्व काही चांगले होते. आपली लढत भाजपशी आहे, याचा विचार प्रत्येक काँग्रेसवासीयाने केला पाहिजे. भाजप देशात फॅसिस्ट सरकार चालवत आहे. अशा स्थितीत काँग्रेसने मजबूत राहणे गरजेचे आहे,” असे गहलोत म्हणाले.
“आमच्या पराभवामागे आम आदमी पक्षाची (आप) मोठी भूमिका आहे. हे लोक जिथे जातात तिथे खोटे बोलतात. आमचे अरविंद केजरीवाल यांनी खूप नुकसान केले,” असा आरोप गहलोत यांनी केला. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तीन महिने काढले. जलद भेटी दिल्या. त्याचे कारणही तेच होते. काँग्रेसमध्येही कमतरता आहेत. भाजपने संस्था संपवल्या आहेत. पराभवाचा एक फॅक्टर फंडिंगचाही आहे. इलेक्टोरल बाँड हा मोठा घोटाळा आहे. भाजपला एकतर्फी पैसा मिळतो. काँग्रेसला देणगी देणाऱ्यांना धमकावले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राजस्थानमधील आपल्या सरकारचे गहलोत यांनी कौतुल केले. “राजस्थानमध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू केली. मानवतेच्या दृष्टीकोनातून आम्ही हे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुनी पेन्शन योजना स्वीकार नाही. यामध्ये लोकांना १० लाखांचा विमाही मिळेल. जर कोणते ऑर्गन ट्रान्सफर झाले तर त्याचे वेगळे पेस देण्यात येतील. देशातील ही सर्वात वेगळी स्कीम आहे. या योजनेशी १.३५ कोटी लोक जोडले गेले आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही गरीब मुलांना मोफत शिक्षण देत आहोत. आम्ही २०० गरीब विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं असल्याचेही ते म्हणाले. भारत जोडो यात्रेचा संदेश संपूर्ण देशात आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला टीका आवडत नाही. टीका कराल तर तुरुंगात जाल. आमच्या या यात्रेशी अनेक लोक जोडले जात आहेत, असेही ते म्हणाले.