यंदा उष्णतेची लाट
By admin | Published: March 4, 2017 04:28 AM2017-03-04T04:28:33+5:302017-03-04T04:28:33+5:30
येत्या दोन महिन्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेला तोंड द्यायची तयारी ठेवावी.
हैदराबाद : येत्या दोन महिन्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेला तोंड द्यायची तयारी ठेवावी.
सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान यंदाच्या उन्हाळ््यात असेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. या दोन्ही राज्यांत आतापासूनच कडक उन्हाळा जाणवू लागला असून, त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पुढील दोन महिने उष्णतेची लाट असेल, असे हवामान खात्याने सांगितल्यामुळे तेथील लोकांना पाण्याचीही टंचाई भासेल, असे दिसत आहे.
हा उन्हाळा गेल्या वर्षीच्या उन्हाळ््यासारखाच असेल. मागच्या वर्षीही तापमान सामान्यापेक्षा जास्त नोंदले गेले. त्यामुळे यंदाही गेल्यावर्षीसारखीच परिस्थिती असेल, असे येथील आयएमडीच्या हवामानशास्त्र केंद्राचे संचालक वाय. के. रेड्डी यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असू शकेल, असेही रेड्डी म्हणाले.
तापमान एप्रिल आणि मे महिन्यात ४७ अंश सेल्सिअस एवढे असू शकेल व पारा या दोन महिन्यांत अनेक दिवस ४५ अंश सेल्सियसच्या जवळपास असेल, असे ते म्हणाले. येत्या उन्हाळ््यातील उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणने (एनडीएमए) गेल्या आठवड्यात म्हटले होते.
राज्यांना कृती योजना
पाठवण्यात आल्यामुळे २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये उष्णतेच्या लाटेत मरण पावणाऱ्यांची संख्या खाली आणता, असे प्राधिकरणचे सहसचिव थिरुप्पुगझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, १९९२ ते २०१५ या कालावधीत देशात उष्णतेच्या लाटेशी संबंधित घटनांमध्ये अंदाजे २२ हजार लोक मरण पावले होते. या वेळी लोकांनी सावधानता बाळगावी. (वृत्तसंस्था)
>अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई
फेब्रुवारी महिना आताच संपला असून, पावसाळा सुरू व्हायला आणखी किमान तीन महिने शिल्लक आहेत. मात्र, ओडिशाच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई आताच भासू लागली आहे. तलाव आताच कोरडे पडू लागले आहेत आणि नद्यांची पातळीही खाली आली आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत ओडिशाला याहून अधिक पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. अनेक भागांत आताच दोन वा तीन दिवसांनी पाणी मिळत आहे. तेही पुरेसे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
२०१५ मध्ये उष्णतेच्या लाटेत २,४०० लोक मरण पावले होते, तर २०१६ मध्ये १,१०० लोक मरण पावले होते.